लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या संवर्ग भाग १ व २ च्या शिक्षकांच्या खो बदल्या झाल्यानंतर त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील काही शिक्षकांना या विभागातील स्थानिक अधिकाºयांच्या चुकांमुळे आणखी मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. समानीकरणात अतिरिक्त ठरलेल्या १९४ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ झाल्याची तक्रार केल्यानंतर अधिकाºयांनीही चूक कबूल केल्याने शिक्षकांनी सोमवारी जि.प.त तीव्र संताप व्यक्त केला.राज्य शासनाच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीच्या धोरणानुसार संवर्ग भाग १ व भाग २ मधील ३०४ शिक्षकांच्या २२ सप्टेंबर रोजी खो बदल्या झाल्या होत्या. यामध्ये १९४ शिक्षकांच्या समानीकरणांतर्गत बदल्या झाल्या. समानीकरणांतर्गत बदल्या करीत असताना स्थानिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षण अधिकाºयांनी पारदर्शकता न ठेवता पूर्वग्रह दूषित पद्धतीने या बदल्या केल्याची तक्रार सोमवारी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्याकडे केली. तत्पूर्वी जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या उपस्थितीत नखाते यांच्या कक्षामध्ये शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीत शिक्षकांनी शिक्षण विभागातील दोन्ही अधिकाºयांना चुकीच्या कार्यपद्धतीबद्दल जाब विचारुन धारेवर धरले. यावेळी या अधिकाºयांकडून चूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्व शिक्षक, उपाध्यक्षा नखाते, शिक्षणाधिकारी गरुड, गटशिक्षणाधिकारी भुसारे हे सीईओं सवडे यांच्या कक्षात दाखल झाले. यावेळी सवडे यांच्यासमोर शिक्षकांनी या प्रक्रियेबद्दल संताप व्यक्त करुन अनेक अनियमितता त्यांच्यासमोर मांडल्या. समानीकरणात अतिरिक्त ठरणारी पदे २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे निश्चित करावयाला पाहिजे होती, ही अतिरिक्त पदे तालुकापातळीवर करण्यात आल्याने पूर्वग्रह दूषितपणे ती ठरविण्यात आली आहेत. अनेक तालुक्यात चुकीच्या पद्धतीने ही प्रक्रिया झाली आहे. १२ सप्टेंबर २०१७ च्या शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार शिक्षकांचे समायोजन करायला पाहिजे होते; परंतु, काही शाळांमध्ये वरिष्ठ शिक्षकांना अभय देत कनिष्ठ शिक्षकांना बळीचा बकरा करण्यात आले आहे. ज्या मोठ्या शाळांवर प्राथमिक शिक्षकांची तीन पदे आहेत, तेथे दोन किंवा एक पदे अगोदरच रिक्त आहेत. अशा पदांचे समानीकरण न करता या जागा मोकळ्या सोडून भरपूर विद्यार्थी असलेल्या शाळांवर तीन पैकी २ पदे अतिरिक्त ठरवून समानीकरण झाले आहे. ज्या शाळेत ६ ते ८ पटसंख्या दहाच्या आत आहे, त्या शाळांवर दोन- दोन पदवीधर शिक्षक कार्यरत ठेवले आहेत. समानीकरण करताना तीन-तीन पदवीधर असलेल्या व कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचा प्राधान्याने विचार करायला हवा होता. मात्र तो न करता बहुसंख्य विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा समानीकरणाच्या बळी ठरल्या आहेत. परिणामी शिक्षकांवरही मोठा अन्याय होत असल्याची भावना आहे. काही मर्जीतील शिक्षकांना सांभाळण्यासाठी इतर शिक्षकांवर अन्याय केल्याचा आरोपही यावेळी शिक्षकांनी केला.यावेळी झालेल्या चर्चेत जि.प. उपाध्यक्षा नखाते यांनीही शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून चूक झाल्याचे सांगितले. गटशिक्षणाधिकारी भूसारे यांनी आपल्याकडे कर्मचाºयांची कमतरता असल्याने शिक्षकांकडून ही कामे करुन घेण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी चुका झाल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी गरुड यांनी मात्र नियमानेच काम केल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे त्या निरुत्तर झाल्या. या सर्व शिक्षकांचे म्हणणे सीईओं सवडे यांनी ऐकून घेतले व त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे सांगून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा काढून मार्ग काढूत, असे आश्वासन दिले. त्यानंतर शिक्षक शांत झाले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर कदम, कार्याध्यक्ष रामराव रोकडे, सरचिटणीस दिलीप श्रृंगारपुतळे, अरुण चव्हाळ, रुस्तुम शेख, किशन इदगे, व्ही.एम.जाधव, कैलास सुरवसे, दीपक शिंदे, गंगाधर चिंचाणे, विनोद लांडगे, किशन तुपसागर, दत्ता गायकवाड, माणिक घाटूळ, संजय चिंचाणे आदी शिक्षकांची उपस्थिती होती.
१९४ बदल्या समानीकरणात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:18 AM