- राम शिनगारे
औरंगाबाद : देशात संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९५२ साली लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते मंगळवारी (दि.२३) झालेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत सेवानिवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
१९५२ पासून आजपर्यंत देशात लोकसभेच्या १७ निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीच्या वेळी भुजंगराव कुलकर्णी हे हैदराबादेत नोकरीनिमित्त होते. त्याठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यानंतर १९५७ साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी भुजंगराव कुलकर्णी औरंगाबादचे जिल्हाधिकारी होते. त्यामुळे औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातील निवडणूक त्यांच्या नेतृत्वातच पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने त्या निवडणुकीत सर्व मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकडे सर्वाधिक लक्ष दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याचे ते सांगतात.
मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. आपला तो हक्क आहे. हा हक्क बजावणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावला. १७ व्या लोकसभेसाठी मंगळवारी सकाळीच कुटुंबियांसह बाबा पेट्रोलपंप परिसरातील मतदान केंद्रावर दाखल होत हक्क बजावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून इतरही दिग्गजांच्या प्रचारसभांचा धुराळा उडत असताना त्यांच्या संरक्षण, नियोजनाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. आयएएस अधिकारी असल्यामुळे मतदान यंत्रणेची जबाबदारीही अनेक वेळा पार पाडावी लागल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानाने लोकशाही बळकट होते भारतीय लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपली लोकशाही मजबूत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी असल्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाशिवाय लोकशाहीला बळकटी येणे शक्य नाही. यामुळे १९५२ ते २०१९ या कालावधीत झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी न चुकता मतदान केले.- भुजंगराव कुलकर्णी, आयएएस अधिकारी, सेवानिवृत्त