- योगेश पायघनऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने १९७० मध्ये यशवंतराव चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ यांना पहिली डी.लिट. प्रदान केली. आतापर्यंत विद्यापीठाने १६ महनीय व्यक्तींना या पदवीने सन्मानित केले आहे.
राजकीय, सामाजिक, साहित्यिक, विज्ञान, कृषी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीला डी.लिट. पदवी द्यायचा प्रघात विद्यापीठात १९७० पासून पडला. मात्र, गेल्या १२ वर्षांत यात खंड पडला होता. विद्यापीठाने पहिल्यांदा ‘एलएलडी’ या मानद डाॅक्टरेट पदवीने यशवंतराव चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ यांना सन्मानित केले. त्यानंतर १९७२ मध्ये गोविंदभाई श्रॉफ यांना एलएलडी, १९७३ मध्ये के. एन. सेठना यांना डीएससी या मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. १९७९ मध्ये पहिली डी.लिट. व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण, १९८० मध्ये मामासाहेब जगदाळे, सनईवादक बिस्मिल्ला खान, १९८३ मध्ये अण्णासाहेब गुंजकर, माधवराव बागल, १९८७ मध्ये देवीसिंह चौहान, सेतूमाधवराव पगडी, त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी १९९९ मध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, २००० मध्ये डॉ. एन. डी. पाटील, २००१ मध्ये बाबा आमटे त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी २०१० मध्ये बद्रीनारायण बारवाले व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना डी.लिट. देऊन विद्यापीठाने सन्मानित केले. त्यांच्यानंतर आता खा. शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सन्मान होणार आहे.
पवार, गडकरी यांना १९ नोव्हेंबरला प्रदान करणार डी.लिट.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ व्या दीक्षांत समारंभ १९ नोव्हेंबर रोजी होत आहे. २०१० नंतर तब्बल १२ वर्षांनी दीक्षांत समारंभात ‘डी.लिट.’ पदवीही दिली जाणार आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांना डी.लिट. देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ विजय भटकर यांचे दीक्षांत भाषण होणार आहे.
पवारांना ही चौथी डी.लिट.शरद पवारांचा मराठवाड्यातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी आणि एमजीएम विद्यापीठ या तीन विद्यापीठांनी डी.लिट. देऊन गौरव केला आहे. मराठवाड्यातील चौथे विद्यापीठ त्यांना आता डी.लिट देऊन सन्मानित करणार आहे.
समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांचा गौरव झाला पाहिजे. त्यासाठी विद्यापीठ कायद्यामधील तरतुदीनुसार विद्यापीठाने तो निर्णय घेतला. प्रस्ताव आला, त्याला राज्यपाल महोदयांची मान्यता मिळाली. व्यवस्थापन परिषद, अधिसभेनेही ते स्वीकारले. त्यानुसार १९ नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट.ने सन्मानित करण्यात येईल.- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद