लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्याशेजारील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना कोलठाणवाडी रस्त्यावर सोमवारी (दि. ९) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून घाटीत हलवले.सोहेल शफिक पठाण (११) आणि शेख युसूफ शेख युनूस (१३, दोघे रा. यासीन कॉलनी, हर्सूल), अशी मृतांची नावे आहेत. हर्सूल पोलिसांनी सांगितले की, सोहेल पठाण शिक्षण घेतो, तर शेख युसूफ शाळेत जात नाही; मात्र ते दोघे चांगले मित्र असल्याने ते नेहमी सोबत राहत. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोहेल शाळेतून घरी आल्यानंतर युसूफसोबत फिरायला जातो, असे सांगून दोघेही घराबाहेर पडले.पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामाहर्सूल ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या खड्ड्याचा आकार आणि खोली याबाबतची माहिती त्यांनी शेतकºयाकडून घेतली. त्यानंतर दुसरे पथक घाटी रुग्णालयात गेले. हर्सूल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी सांगितले.
पोहायला गेलेल्या दोन बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 1:28 AM