लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न करणाºया शुभ कल्याण मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ आणि मॅनेजरविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात सोमवारी आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. सोसायटीने तक्रारदारांची २ कोटी १९ लाख ५२ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.दिलीप आपेट, भास्कर शिंदे, अजय आपेट, विजय आपेट, अभिजित आपेट, बापूराव सोनकांबळे, शिवकुमार शेटे, राम महादेव रोडे आणि पाच महिला आरोपींचा यात समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार रितेश सतीश कुपलानी (३३, रा. सिंधी कॉलनी) यांचे त्रिमूर्ती चौकात कापड दुकान आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी आरोपींनी तक्रारदार यांच्या दुकानात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोसायटी ही विविध राज्यांत कार्यरत असून, कोट्यवधींची उलाढाल करीत असते. मुदत ठेवीवर सोसायटी अन्य वित्तीय संस्थांपेक्षा अधिक परतावा देते हे पटवून दिले. सोसायटीचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ हे स्वत: गुंतवणूक सुरक्षित असल्याची ग्वाही देत असल्याने तक्रारदारांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनी सोसायटीत रोख रक्कम मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवली.या ठेवीचे प्रमाणपत्रही सोसायटीने त्यांना दिले. मुदत संपल्यानंतर तक्रारदार सोसायटीच्या कार्यालयात गेले असता कार्यालयास त्यांना कुलूप दिसले. त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आरोपींनी कट रचून आपली फसवणूक केल्याचे समजल्याने कुपलानी यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन तक्रार दिली.पोलीस आयुक्तांनी तक्रार अर्जावर कारवाई करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी तक्रारीची चौकशी करून याप्रकरणी सोमवारी रात्री जवाहरनगर ठाण्यात सोसायटीच्या संचालक मंडळासह अधिकाºयांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक नवले हे तपास करीत आहेत.यापूर्वी दोन गुन्हे दाखलफसवणूकप्रकरणी सोसायटीविरुद्ध क्रांतीचौक, सिटीचौक ठाण्यात यापूर्वी दोन गुन्हे नोंद आहेत. शिवाय राज्यातील विविध ठिकाणीही गुन्हे दाखल होत आहेत. जवाहरनगर ठाण्यात सोमवारी दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. या प्रकरणातील आरोपी शेटे हा अटकेत असून, अन्य आरोपींनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
शुभ कल्याण मल्टीस्टेटच्या संचालकावर औरंगाबादेत २ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:17 AM