औरंगाबाद : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पावसाळ्याच्या तोंडावर काढलेली २ कोटी रुपयांची निविदा आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणांची केलेली दुरूस्ती टिकणे शक्य नसते. त्यामुळे निविदा रद्द करण्याची मागणी पुढे आली होती. सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील मातीच्या पाच धरणांच्या दुरूस्तीच्या निविदा महामंडळाने काढल्या होत्या.
सदरील धरणांच्या दुरूस्तीचे काम फेब्रुवारी ते मेअखेरपर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु त्यासाठी काही प्रयत्न झाले नाहीत. मान्सून सुरू होण्यापूर्वीच ही कामे पूर्ण झाली असती तर पावसाळ्यात त्याचे परिणाम दिसून आले असते. मात्र, पावसाळ्यातच डागडुजी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. केवळ मर्जीतील काही गुत्तेदारांसाठी ही उठाठेव केल्याचा आरोप करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शासनाच्या नियमानुसार सर्व कामे ऑनलाईन देण्याचे आदेश असताना या निविदा काढताना सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याचेही आरोप करण्यात आले. त्या धरणांची डागडुजी पावसाळ्यानंतर करण्याची मागणी महामंडळाचे कार्यकारी संचालक कुलकर्णी यांच्याकडे शिवसेनेतर्फे करण्यात आली होती.
चौकशीअंती सर्व समोर येईल
कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांना या प्रकरणाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, निविदा प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून चौकशी होत आहे. चौकशीअंती सर्व काही समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.