औरंगाबाद : कोरोनावरील उपचारादरम्यान सलाइनसाठी टोचलेली प्लास्टिकची सुई (अँजोकॅथ) हातातच राहिली. तब्बल ३ महिने त्रास सहन केल्यानंतर ३१ जुलै रोजी घाटीत शस्त्रक्रिया करून २ इंच सुईचा तुकडा काढण्यात आला. (A 2-inch needle piece remained in hand during Corona's treatment )
नितीन खांडे (रा. दावरवाडी, ता. पैठण), असे शस्त्रक्रिया झालेला रुग्णाचे नाव आहे. १९ ते २७ एप्रिलदरम्यान त्यांच्यावर मेट्राॅनमध्ये उपचार करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या उजव्या हातात सलाइनसाठी अँजोकॅथ लावण्यात आली होती. उपचारानंतर ही अँजोकॅथ काढण्यात आली; परंतु त्याचा काही भाग त्यांच्या हातातच राहिला. याविषयी त्यांनी तेथील डाॅक्टरांना सांगितले. मात्र, जास्त दिवस सुई राहिल्याने त्रास होत असेल, असे तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कयास लावत त्याकडे दुर्लक्ष केले.
सुटी घेऊन घरी गेल्यानंतरही नितीनच्या हाताला त्रास जाणवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी एका खाजगी रुग्णालयात दाखविले. तेथील डाॅक्टरांनी हातात सुई असल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेसाठी जवळपास ४० हजार रुपये खर्च येईल, असे सांगितल्यानंतर त्यांनी घाटीत जाण्याचा निर्णय घेतला. सीटी स्कॅनमध्ये २ इंचाच्या प्लास्टिकच्या सुईचा तुकडा असल्याचे निष्पन्न झाले. ३१ जुलै रोजी शस्त्रक्रिया करून हा तुकडा काढण्यात आला. याविषयी नितीन खांडे यांनी मनपा आणि सिडको एमआयडीसी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
चौकशी केली जाईलसदर व्यक्तीने आमच्याकडेही तक्रार केली आहे. अँजोकॅथ तुटले आहे. यासंदर्भात चौकशी करून अहवाल दिला जाईल, असे मनपाच्या आराेग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी सांगितले.