हिंगोली : पैसे पडल्याचे सांगत दुचाकीला अडकविलेली २ लाख ८० हजार रुपयांची रक्कम ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळविली. ही घटना हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोल पंपाजवळ २ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.हिंगोली शहरातील मोंढ्यातील व्यापारी विक्रम अग्रवाल यांच्याकडे राजू बेंगाळ हे कामाला आहेत. गुरूवारी दुपारी बेंगाळ बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून २ लाख ८० हजार रुपये काढून बॅगमध्ये ठेवले. पैशाची बॅग दुचाकीला अडकवून ते मोंढ्याकडे निघाले होते. त्यांची दुचाकी खुराणा पेट्रोल पंपाजवळ आली असता तेथे थांबलेल्या एकाने तुमचे दीडशे रुपये पडले असे सांगितले. त्यामुळे बेंगाळ यांनी दुचाकी थांबवून दीडशे रुपये घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या संधीचा फायदा घेत दुसऱ्याने दुचाकीला अडकविलेली पैशाची बॅग पळविली. या वेळी बेंगाळ यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थागुशाचे उदय खंडेराय, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन केणेकर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
हेही वाचा - खासदार नांदेडमध्येच बोलतात दिल्लीत बोलता येत नाही; आमदार अमर राजूरकरांची बोचरी टीका