छत्रपती संभाजीनगर : कोरोना काळात सेवा देणाऱ्या डाॅक्टरांना पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत ५० लाख रुपये विम्याचा लाभ देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या व्यवस्थापनात देशभरात २ हजार डाॅक्टरांचा मृत्यू झाला. परंतु कोणालाही पॅकेज मिळालेले नाही. आम्ही स्वत: या डाॅक्टरांच्या कुटुंबीयांना मदत केली, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरदकुमार अग्रवाल म्हणाले.
महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त गुरुवारी शहरात आल्यानंतर डाॅ. शरदकुमार अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आओ गाव चले’ हे अभियान राबविण्यात येत असून, यात देशात २ हजार आणि महाराष्ट्रात २४० गावे दत्तक घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ. जयेश लेले, डॉ. शिवकुमार उत्तुरे, ‘आयएमए’चे महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, डॉ. संतोष कदम, डॉ. राजीव अग्रवाल, शाखेचे अध्यक्ष डॉ. सचिन फडणीस, सचिव डॉ. उज्ज्वला दहिफळे, डाॅ. राजेंद्र गांधी, डाॅ. रमेश राेहिवाल, डाॅ. संतोष रंजलकर, डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. प्रफुल्ल जटाळे आदी उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयांचे निरीक्षण इमानदारीने?डाॅ. अग्रवाल म्हणाले, पूर्वी ‘एमसीआय’ होते. त्यानंतर ‘एनएमसी’ झाले. ‘एमसीआय’ काम करतानाही अनेक डाॅक्टर घडले. त्यांना जगभरात मान मिळाला. जुन्या सिस्टीमद्वारेच डाॅक्टर बनले. ही सिस्टीम बदलून ‘एनएमसी’ आणण्यात आले. ही सिस्टीम अधिक कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ‘एनएमसी’ हे काम करू शकली का, वैद्यकीय महाविद्यालयांत इमानदारीने निरीक्षण होत आहे का, असा प्रश्न आहे.
चॅट जीपीटी डाॅक्टरांची जागा घेणार नाहीकोणत्याही टेक्नाॅलॉजीचा वापर केला पाहिजे. परंतु त्याचा वापर कसा केला जातो, यावर सर्वकाही अवलंबून आहे. टेक्नाॅलॉजी अनुभव, ज्ञानाला मदत करते. परंतु त्यावरच अवलंबून राहू नये. चॅट जीपीटी, टेक्नाॅलाॅजी डाॅक्टरांची जागा घेऊ शकणार नाही, असेही डाॅ. अग्रवाल म्हणाले.
पाॅलिसीपासून ‘आयएमए’ला ठेवतात दूरवैद्यकीय शिक्षणाच्या सिस्टीमसोबत सरकारने खेळ करू नये. नवीन पाॅलिसी करताना ‘आयएमए’ला सहभागी करून घेतले पाहिजे. नि:स्वार्थ सल्ला दिला जाईल. ४ लाख अनुभवी डाॅक्टर आहेत. परंतु ‘आयएमए’ला कुठेही सहभागी करून घेतले जात नाही, अशी खंत डाॅ. अग्रवाल व्यक्त केली.