छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव अशा दोन महिला आमदार झाल्या आहेत. जिल्ह्यातील आजवरच्या महिला आमदारांचे प्रमाण फार मोठे नाही. पूर्वी चार महिला आमदार झाल्या. आता फुलंब्री व कन्नडमधून अनुक्रमे अनुराधा चव्हाण व संजना जाधव यांनी यश मिळवले.
१९५२ साली वैजापूरहून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आशाताई वाघमारे या आमदार म्हणून निवडून आल्या. वैजापूरहून दिवंगत विनायकराव पाटील यांच्या पत्नी शकुंतला पाटील याही आमदार बनल्या होत्या. तर १९६७ साली कॉ. करुणाभाभाी चौधरी या गंगापूरतून निवडून आल्या होत्या. रायभान जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव या १९९८ सालच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या.
यावेळी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत मिळून २२ महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. त्यात औरंगाबाद पश्चिममधून पंचशीला जाधव (रिपब्लिकन बहुजन सेना), मनीषा खरात (स्वतंत्र), सुलोचना आक्षे (स्वतंत्र) यांचा समावेश होता. औरंगाबाद पूर्वमधून शीतल बनसोडे, झकेरिया शकिला नाजेखान पठाण, तस्नीम बानो इक्बाल मोहंमद व नीता भालेराव या चार महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या. औरंगाबाद मध्यमधून कांचन जांबोटी या एकमेव महिलेने अर्ज भरला होता.
६ पैकी ३ मतदारसंघांत पाटी कोरी.....गंगापूर, फुलंब्री व कन्नड या ३ विधानसभा मतदारसंघांत ८ महिला उमेदवार निवडणूक लढवीत असून, वैजापूर, सिल्लोड आणि पैठण या ३ मतदारसंघांत यावेळी एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हती. गंगापूरमधून सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पार्टीच्या उमेदवार अनिता वैद्य व अपक्ष पुष्पा जाधव या दोन, तर फुलंब्रीमधून महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण आणि अपक्ष ॲड. अंजली साबळे (पानसरे) या दोन महिला उमेदवार उभ्या होत्या. सर्वाधिक ४ महिला उमेदवार कन्नड - सोयगाव विधानसभा मतदारसंघात होत्या. महायुतीच्या उमेदवार संजना जाधव, बहुजन समाज पार्टीच्या रंजना जाधव, अपक्ष संगीता जाधव आणि मनीषा राठोड यांचा समावेश होता.
१३ निवडणुकांत फक्त १४ महिला उमेदवारजिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांत १९७२ ते २०१९ या कालावधीत विधानसभेच्या १३ निवडणुका झाल्या. यात फक्त १४ महिलांनी निवडणूक लढविली. त्यात १९९८ मध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढविलेल्या तेजस्विनी रायभान जाधव या एकमेव महिला विजयी झाल्या होत्या.