बसस्थानकाच्या कामाला कंत्राटदाराचा नकार
नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार : आता किमान बसपोर्टचे काम तरी लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसस्थानक उभारणीसाठी औरंगाबादकरांना आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. विकास शुल्क माफ करण्याच्या गोंधळात २ वर्षे उलटली. त्यामुळे आता कामाचा १८ महिन्यांचा कालावधी संपल्याचे कारण पुढे करून कंत्राटदाराने करार संपवित कामाला नकार दिला आहे. यामागे वाढलेली महागाई आणि कोरोनामुळे बिघडलेले अर्थचक्र हे कारण समजते. त्यामुळे बसस्थानकाच्या कामासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
बसपोर्टसह मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले. परंतु भूमिपूजनानंतर दोन वर्षे उलटूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. मध्यवर्ती बसस्थानकाच्या नव्या इमारतीसाठी एसटी महामंडळाने बांधकाम परवानगी मागितली. त्यावर महापालिकेने महामंडळाला १. ६२ कोटी रुपये विकास शुल्क भरण्यास सांगितले. परंतु एसटी ही शासनाचाच एक भाग असल्याने महामंडळाने हे विकास शुल्क माफ करण्याची मागणी केली. वारंवार चर्चा झाली. यात दोन वर्षे लोटली. महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच हे विकास शुल्क माफ केले. मात्र, त्यापूर्वीच कंत्राटदाराने एसटी महामंडळाकडे बसस्थानक बांधणी संदर्भातील करार संपविण्याची विनंती केली. ही विनंती मान्य झाली असून कंत्राटदाराने भरलेले १ कोटी ८४ लाख रुपये परत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कंत्राटदार आणि एसटी महामंडळाच्या विभागीय अभियंता कार्यालयातर्फे सांगण्यात आले. बसस्थानकाच्या कामासंदर्भात आपल्याला अद्याप काही माहिती प्राप्त झालेली नाही, असे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
५० वर्षे जुने बसस्थानक
मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. आजघडीला बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. प्लास्टर निखळल्याने जागोजागी छतातील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. ठिकठिकाणी भिंतीतून पावसाचे पाणी गळते. इमारतीवर ठिकठिकाणी झाडे वाढली असून, त्यांची मुळे जमिनीपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे बसस्थानकाची अवस्था धोकादायक झाली आहे.
प्रत्यक्षात कधी होणार?
सिडको बसस्थानकाच्या जागी विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानक उभारण्याचे नियोजन आहे. परंतु बसपोर्टच्या कामासाठी सिडकोकडून एनओसी मिळणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अद्ययावत बसस्थानक आणि बसपोर्ट कधी होणार, असा सवाल प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.