वाळूज महानगर : वन्यप्राण्याने हल्ला करुन २० शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना गुरुवारी नारायणपूर शिवारातील शेतवस्तीवर उघडकीस आली आहे. वन व महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला केल्याचा दावा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
वाळूज येथील अरुण भुजंग, सुनिल भुजंग व अनिल भुजंग यांची नारायणपूर शिवारातील गट क्रमांक २७ मध्ये असलेल्या शेती असून, या ठिकाणी तिन्ही भाऊ कुटुंबासह शेतवस्तीवर वास्तव्यास आहेत. पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण येथे नातेवाईकाकडे लग्न समारंभ असल्यामुळे बुधवारी अरुण भुजंग हे पत्नीसह गेले होते. गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ऋषी व विशाल भुजंग हे झोपेतून उठल्यावर शेळ्या बांधलेल्या पत्र्याच्या शेडकडे गेले असता त्यांना बहुतांश शेळ्या जखमी व मृतावस्थेत दिसल्या.
शेडची संरक्षक जाळीही तुटलेली दिसून आली. अनिल भुजंग यांनी वन, महसूल व पशु वैद्यकीय विभागाला या प्रकाराची माहिती दिली. शेडमध्ये बांधलेल्या २४ पैकी २० शेळ्या वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचे वन व महसूल विभागाच्या पथकाला दिसून आल्याने पंचनामा करण्यात आला.
लांडग्याने हल्ला केल्याचा अंदाजशेडलगत जमिनीवर मिळालेले ठसे हे लांडग्याचे असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या विषयी सहायक पशुधन अधिकारी डॉ. चव्हाण म्हणाले की, हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात या शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून, संबंधित मालकास तसे मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येईल, असे सांगितले.