औरंगाबाद : शैक्षणिक संस्थेच्या जाहिराती प्रसिद्ध करून २५ लाख ७५ हजार रूपयांचे बील अदा न करता केवळ साडेतीन लाख अदा करून बंद खात्याचे धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण संस्थाचालकाविरूद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहण भालचंद देशपांडे (रा. गारखेडा) हे ‘माय अर्काय कम्युनिकेशन सोल्युशन’ ही कंपनी चालवितात. यात अमरजितसिंग अजय चव्हाण त्यांचे भागीदार आहेत. त्यांनी आयडीया एज्युकेशन फर्स्ट आयडीया संस्थेचे संचालक सचिन मलिक यांनी दिलेल्या शैक्षणिक जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.
१ मार्च २०१७ ते ३० आॅगस्ट २०१७ या दरम्यान जाहिराती पोटी २५ लाख ७५हजारांची थकबाकी झाली होती. त्यांच्याकडे वसुलीचा तगादा लावला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, मलिक याने साडे तीन लाख रुपये जाहिरात एजन्सीला दिले. त्यानंतर फोन बंद ठेवून त्याना टाळले. अखेर मलिक ची भेट घेऊन थकित २३ लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यात २० लाख देण्यावर तडजोड झाली.
बैठकीत बँक आॅफ महाराष्ट्रमधील बंद खात्याचे ६ वेगवेगळ्या रकमेचे धनादेश दिले. परंतु ते धनादेशही वटले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रोहन देशपांडे यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सचिन मलीक याच्याविरूद्ध मुकुंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास फौजदार संजय बनसोड करीत आहेत.