वाळूज महानगर : नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आमिष दाखवून बजाजनगरातील एका विद्यार्थ्याला २० लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजाजनगरातील रोहित मुरमुरे याने बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण असून, २०१८-१९ मध्ये त्याने ‘नीट’ची परिक्षा दिली होती. रोहितला ‘नीट’च्या परिक्षेत १८० गुण मिळाल्यामुळे त्यास शासकीय कोट्यातून महाविद्यालयात प्रवेश मिळेल, अशी खात्री होती. मात्र, शासकीय कोट्यातून प्रवेश न मिळाल्याने रोहितचे वडील रामचंद्र मुरमुरे यांनी खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विविध ठिकाणी चौकशी सुरु केली होती. त्यातच २७ आॅगस्ट २०१८ रोजी नागपूरच्या एन.के.पी.साळवे मेडिकल इन्स्टिट्युट महाविद्यालयातील कर्मचारी संजय थोटे याने मुरमुरेंशी संपर्क साधून प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. औरंगाबाद येथील चंद्रशेखर पंजाबराव आत्राम यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. आत्राम याने प्रवेशासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली. यानंतर २८ आॅगस्टला मुरमुरे रोहितसह नागपूरच्या एनकेपी साळवे महाविद्यालयात गेले. नागपूरात संजय धोत्रे यांच्या कार्यालयात चंद्रशेखर आत्राम व त्याचा सहकारी पंकज कृपाशंकर दुबे यांच्याशी मुरमुरे पिता-पुत्रांनी चर्चा केली.
या ठिकाणी २५ लाखांत रोहित यास नागपूरला एमबीएसएसला प्रवेश मिळवून देऊ, असे सांगितले. मात्र, त्यानंतर तिघांनी २० लाखांत प्रवेश देण्याचे आश्वासन दिले. मात्र, धनादेशाद्वारे पैसे देणार असल्याचे या तिघांना सांगितले. यावेळी संजय धोत्रे याने मी नोकरीस असून माझ्या खात्यावर पैसे टाकु नका, असे सांगत चंद्रशेखर आत्राम याच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा सल्ला देत आॅगस्टअखेर अथवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोहित याचा प्रवेश होईल, असे सांगितले.
मुरमुरे यांनी वाळूजच्या एसबीआय शाखेचे प्रत्येकी ८ लाख रुपयाचे दोन धनादेश क्रमांक ०००५४५९१८ व ०००५४५९१९ असे चंद्रशेखर आत्राम यांना दिले. यानंतर मुरमुरे यांनी सेंट्रल बॅक आॅफ इंडिया, शाखा क्रांती चौक या शाखेतून ४ लाख रुपये आत्राम यांच्या खात्यावर ट्रॉन्सफर केले. पैेसे दिल्यानंतर त्यांनी रोहितची कागदपत्रे प्रवेशासाठी संजय धोत्रे याच्याकडे दिली असता त्याने ही कागदपत्रे आत्राम याच्याकडे जमा केली.
पैसे देवूनही प्रवेश मिळत नसल्याने मुरमुरे यांनी संजय धोत्रे, चंद्रशेखर आत्राम व पंकज दुबे यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. यामुळे दुबे व आत्राम यांनी प्रत्येकी १० लाखांचे दोन धनादेश मुरमुरे यांना दिले. दरम्यान, दुबेने दिलेला धनादेश वटला नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच रामचंद्र मुरमुरे यांनी या तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन संजय धोत्रे, चंद्रशेखर आत्राम व पंकज दुबे या तिघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.