वैजापूर : खिडकी तोडायची, आत घुसायचे अन् गॅस कटरने बँकेची तिजोरी फोडून असेल तेवढी रक्कम घेऊन पोबारा करायचा, असा बँकेत दरोडा टाकण्याचा सपाटा चोरट्यांनी ग्रामीण भागात सुरू केला आहे. कालिमठ (ता. कन्नड) आणि वडोदबाजार (ता. फुलंब्री) येथील बँक फोडीचा अजून तपास लागलेला नाही तोच वैजापूरमध्ये सोमवारी दरोडेखोरांनी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मार्केट यार्ड परिसरातील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडून तब्बल २० लाखांची रोकड लंपास केली. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात वारंवार चोऱ्या व दरोड्याचे प्रकार घडत असल्याने पोलिसांना हे मोठे आव्हान ठरत आहे. रविवारी बँकेला सुटी असल्याने ही घटना नेमकी शनिवारी रात्री घडली की रविवारी याबाबत निश्चित समजू शकले नाही. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की, वैजापूर शहरातील मार्केट यार्ड भागातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची खिडकी तोडून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. गॅस कटरने तिजोरी फोडून २० लाख ७ हजार ७७९ रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. सोमवारी सकाळी १० वाजता बँकेचे शाखाधिकारी बाटिया व दोन शिपाई यांनी बँक उघडली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वैजापूर पोलिसांना दिली.
वैजापूर जिल्हा बँकेत २० लाखांचा दरोडा
By admin | Published: September 08, 2015 12:29 AM