प्रताप नलावडे , बीडगेल्या २८ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफ-सुवर्णकारांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील २० हजार सराफ आणि कारागीर बेरोजगार झाले आहेत. याचा परिणाम आर्थिक उलाढालीवरही झाला असून जिल्ह्याला दोनशे कोटींचा फटका बसला आहे. शासनाने सराफ-सुवर्णकारांना एक टक्का अबकारी कर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाला विरोध करत या कायद्यातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी देशभरात सराफ-सुवर्णकारांनी दुकाने बेमुदत बंद ठेवत आपला निषेध व्यक्त केला आहे. बीड शहरात दोन दिवसांपूर्वी सराफ-सुवर्णकारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जात असताना पोलीसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यामुळे या आंदोलन हिंसक वळणावर गेले.बीड शहरात सराफ-सुवर्णकारांची १७० दुकाने असून या व्यवसायावर शहरातील दोन हजार लोक अवलंबून आहेत. जिल्ह्यात १३६५ दुकाने असून वीस हजार लोक या व्यवसावर अवलंबून आहेत. सराफ दुकानाच्या मालकापासून ते दुकानात काम करणाऱ्या कामगार, दागिण्यांवर गलाई, डाय प्रेस, जोडकाम, पॉलीश, तासकाम, मीना काम आणि खडा काम करणाऱ्या कारागिरांचाही यात सामावेश आहे. बंदमुळे या कारागिरांचे दररोजचे अर्थकारण पार बिघडून गेले आहे. कारागिरांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे बीड तालुकाध्यक्ष कैलास मैड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मैड म्हणाले, आमच्या सगळ्यांच्याच अर्थकारणावर याचा परिणाम झाला आहे. मार्च महिना असल्याने बँकांचे हप्ते भरण्यासाठी तगादे आहेत. बंद मुळे हप्ते कसे भरायचे याच्या विवंचनेत सगळेच सराफ आहेत. कारागिरांना काम नसल्याने त्यांच्या दैनंदिन गरजा आता आम्ही सगळे सराफ व्यावसायिक पूर्ण करत आहोत. कारागिरांना धान्य आणि गरजेच्या वस्तूसह रोख पैसेही आम्ही देत आहोत. परंतु हे सगळे आणखी फार दिवस करता येणे शक्य होईल की नाही, याचीही भीती वाटते.सराफ-सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मानुरकर, भास्कर बागडे, कल्याण डहाळे, रावसाहेब टाक, मंजुळदास गवळी, राजेंद्र निर्मळ, अनिल चिद्रवार, अनंत रूद्रवार, गणेश बागडे, सुधाकर दहिवाळ, देवीदास कोळपकर, भास्कर टाक यांनी लोकमतशी बोलताना सरकारच्या अबकारी कराला आमचा विरोध नाही, असे सांगत जाचक अटी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली.
२० हजार सुवर्णकार बेरोजगार
By admin | Published: March 31, 2016 12:09 AM