औरंगाबाद: २० वर्षांपूर्वी समोर प्रेक्षकात बसलो होतो. आज स्टेजवर उभा आहे. एकटे काही करू शकत नाही. हे सर्व गुरुजन आणि मित्रांच्या साथीने शक्य झाले. कुटुंबियांनी साथ दिली म्हणून आयुष्याला कलाटणी मिळाली. अभिनयाच्या क्षेत्रात १८ वर्ष झाले पण अद्यापही स्ट्रगल करतोय. आज हा क्षण पाहण्यासाठी वडील हवे होते, त्यांना मिस करतोय, अभिनेता सुहास सिरसाट यांच्या या भावपूर्ण मनोगताने संपूर्ण सभागृह गहिवरले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवाच्या सामोरोप प्रसंगी बोलत होते.
विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्वाचा आज समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या सहज साध्या अभिनय शैलीसाठी प्रसिद्ध अभिनेता सुहास सिरसाट उपस्थित होते. ते बीड जिल्ह्यातील असून विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. यामुळे त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी संपूर्ण सभागृह आतुर होते. पुढे बोलताना, सुहास सिरसाट म्हणाले, नाट्यशास्त्र विषय बीड मध्ये आला आणि बर चांगलं माहीत नाही पण पास होऊन नाट्यशास्त्र पदवीला प्रवेश घेतला. युवक महोत्सवाने मला अभिनयाचा आत्मविश्वास दिला. वेळेचं भान मला गुरूंनी दिले. लहानपणी काळ्या म्हटलं तर राग येत होता. पण आज याच रंगाचे मार्केट आहे. निगेटिव्ह पॉईंट बाजूला करून पॉझिटिव्ह पॉईंट घेऊन पुढे गेलो. टॅलेंट दाखवलं तर यशाला पर्याय नसतो. चार वर्षे नाटकं केल्याने काम मिळाले. कामाशी प्रामाणिक रहा. स्वतःला फसवू नका ते सर्वात वाईट. घरच्यांना विश्वासात घ्या. १८ वर्षांपासून काम करतोय पण अजूनही स्ट्रगल सुरू आहे. चांगला नट आणि माणूस बनण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी प्रांजळ कबुली यावेळी सिरसाट यांनी दिली. त्यांच्या या मनोगताने संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. याच दरम्यान बीडच्या भूमिपुत्राचे स्वागत म्हणून ' कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा, बीड जिल्हा' अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ म्हणाले, कलेच्या माध्यमातून यशस्वी होणं महत्वाचे आहे. पारितोषिक गौण आहे. प्रस्ताविकात डॉ संजय सांभाळकर म्हणाले, युवा महोत्सवात काळजाचे ठोके वाढवणाऱ्या या सोहळ्यात २ महिन्यांपासून केलेल्या मेहनतीचे चीज झाले. २४७ महाविद्यालयांनी २८०८ संघ आणि संघप्रमुखांनी सहभाग नोंदवला. वृत्तसाधनाच्या अंकाचे विमोचन झाले. सूत्रसंचालन विनोद जाधव यांनी केले.