औरंगाबाद : घाटी रुग्णालयात माता व बाळाला एकाच छताखाली उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्यात येणार आहे. या विभागाच्या उभारणीला ३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी दिली.
घाटी रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांची संख्या मोठी आहे. असे असले तरी अनेक अडचणींना हे रुग्णालय तोंड देत आहे. याही परिस्थितीत घाटी रुग्णालयात प्रसूतींची संख्या दररोज सुमारे ५० ते ६० एवढी असून वर्षभरात १८ हजारांहून अधिक नॉर्मल प्रसूती आणि ४ हजारांपर्यंत सिझेरियन प्रसूती होतात. प्रसूतीनंतर त्यातील जवळपास ३ हजारांपेक्षा अधिक बालके नवजात शिशू विभागात दाखल होतात. त्यामुळे एका वॉर्डात माता, तर दुसऱ्या वॉर्डात बाळांवर उपचार करावे लागतात.
२०० खाटांच्या नव्या विंगच्या माध्यमातून माता व नवजात शिशूंवर एकाच छताखाली उपचार करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये २०० माता आणि ८० नवजात शिशूंवर अतिविशेषोपचार केले जातील. नवजात शिशूंसह प्रसूत आणि गरोदर मातांना चांगले उपचार मिळण्यास मदत होईल. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, स्वतंत्र माता व बालविभागासाठी जागा निश्चित करून त्याचा नकाशाही तयार करण्यात आला आहे.
अद्ययावत आरोग्य केंद्रांचे नियोजनराष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा आणि जरंडी, औरंगाबाद तालुक्यातील चौका, फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव, खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी, गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव आणि सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मुख्य इमारती आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही अद्ययावत करण्यात येणार आहेत.