खुलताबाद ( औरंगाबाद ) : सोनखेडा ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता ग्रामपंचायत सदस्याने गावातील दोनशे वर्षापूर्वींची चिंच आणि लिंबाची दोन महाकाय वृक्ष परस्पर आदेश देऊन तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आली आहे. झाडे तोडण्याचे आदेश देणाऱ्या ग्राम पंचायत सदस्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थाने तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तालुक्यातील सोनखेडा ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेले चिंचेचे झाड व सामाजिक सभागृहाच्या बाजूचे लिंबाचे झाड ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र नामदेव कसारे यांनी लाकूड व्यापारी पुंडलिक महादू वाकळे यांना दिले. व्यापाऱ्याने २५ ऑगस्ट आणि २८ ऑगस्टला दोन्ही महाकाय वृक्ष जमीनदोस्त केली आहे. मात्र, याबाबत कसारे यांनी ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील व मालकीची ही झाडे तोडण्यासाठी ग्रामपंचायत अथवा वनविभागाची कुठलीही परवानगी अथवा लिलाव न करता शासकीय मालमत्तेची विल्हेवाट लावणे गंभीर असून याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कसारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी तक्रार ग्रामस्थ संतोष अंबादास लाटे यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतची प्रतिलिपी वनवि़भाग व पोलीस निरीक्षक खुलताबाद यांना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणाची मला माहिती नाही याबाबत बघून चौकशी करतो असे गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर यांनी सांगितले.
ग्रामसभेत झाडांच्या कत्तली विषयी चर्चासोनखेडा ग्रामपंचायतीची मंगळवारी ( दि. ३१ ) सरपंच ललिता सोनवणे व जि. प. सदस्य सुरेश सोनवणे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. यावेळी अवैधरित्या तोडण्यात आलेल्या झाडांबाबत चर्चा झाली. यापुढे कोणीही पूर्व परवानगी शिवाय झाडे तोडू नये असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच दोन्ही झाडे तोडण्यास जबाबदार असणाऱ्या तिघांना प्रत्येकी तीन हजार रूपये दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे.
पंचनाम्यात सदस्याने तोडण्याचा आदेश दिल्याचे नमूद लिंबाच्या झाडाची लाकडे ग्रामपंचायतीने जप्त केली आहेत. ग्रामसेवक जनार्दन आधाने यांनी २९ ऑगस्ट रोजी तोडलेल्या झाडांचा स्पॉट पंचनामा केला. पंचनाम्यात ग्रा. पं. सदस्य राजेंद्र कसारे यांच्या सांगण्यावरून झाडे तोडल्याचा जबाब लाकडाचे व्यापारी पुंडलीक महादू वाकळे यांनी दिल्याचे नमूद केले आहे. तसेच ग्रामपंचायतीत याबाबत काहीही कल्पना नाही व कुठलीही झाडे तोडण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे ही नमूद आहे.