छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सिंचन अनुशेषांतर्गत प्रलंबित प्रकल्पाची कामे पूर्ण करणे आणि परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत नवीन चार बंधारे बांधण्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपये निधीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर सादर करणार आहे.
मराठवाड्यात सिंचनाचा सुमारे २५ हजार कोटींचा अनुशेष आहे. हा अनुशेष भरून काढणे गरजेचे आहे. मात्र, शासन भरीव निधी देत नाही. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त दि. १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक शहरात होणार आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागावे आणि नवीन प्रस्तावित प्रकल्पांना शासनाची मंजुरी मिळावी, यासाठी विविध विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने सुमारे २ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार केल्याची माहिती सूत्राने दिली.
पूर्णा नदीवर चार मोठे बंधारे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. यातील तीन बंधारे परभणी जिल्ह्यात तर एक हिंगोली जिल्ह्यात असेल. हे बंधारे बांधण्यासाठी सुमारे १ हजार कोटींची आवश्यकता आहे. जायकवाडी प्रकल्पाची विश्वासार्हता आणखी वाढावी, यासाठी गोदावरी प्रवाही वळण योजना दोनला शासनाची मंजुरी मिळावी, असा महामंडळाचा प्रयत्न आहे. सिंचन अनुशेषांतर्गत निधीअभावी रखडलेल्या उंकेश्वर प्रकल्पाचे (ता. किनवट, जि. नांदेड) काम पूर्ण करण्यासाठी २३२ कोटींची गरज आहे. या प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मंजुरी मिळावी, यासाठी महामंडळाने प्रस्ताव तयार केला आहे.
-वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथील उच्च बंधाऱ्याचे काम करण्यासाठी सुमारे ३०० कोटींची गरज आहे.-जालना जिल्ह्यातील मंठाजवळील बरबडा प्रकल्प मागील दहा वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पासाठी ३५५ कोटी रुपये लागतील.
जुने आणि नवीन प्रकल्पछत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार केले आहेत. यातील काही प्रस्ताव जुने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आहे तर काही प्रस्ताव नवीन प्रकल्पांचे आहेत.-संतोष तिरमनवार, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ