छत्रपती संभाजीनगर : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सायंकाळी अचानक जाहीर केले की, ३० सप्टेंबरनंतर २ हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद होतील. यामुळे खडबडून जागे झालेल्या नागरिकांनी या नोटांद्वारे डिझेल- पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गर्दी केली. शहरातील विविध पंपावर रात्री १०० पेक्षा अधिक दोन हजारांच्या नोटा जमा झाल्याची शक्यता पंपचालकांनी व्यक्त केली.
रिझर्व्ह बँकेने २ हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलून घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. बँकांनीही या नोटा खातेदारांकडून घ्याव्यात व त्या पुन्हा व्यवहारात आणू नयेत. त्या रिझर्व्ह बँकेच्या खात्यात जमा कराव्यात, असे आदेश दिले आहेत. पुढील चार महिने नोटा बदलण्यासाठी मुदत दिली आहे. मात्र, एका खातेदाराला एकाच वेळी १० नोटा बँक बदलून देणार आहे, ही बातमी सायंकाळी शहरात वाऱ्यासारखी पसरली. २ हजाराच्या नोटा व्यवहारातून बंद झाल्या, अशा अफवा शहरात पसरल्या. मात्र, या नोटा व्यवहारात पुढील चार महिने सुरू राहणार असल्याने अनेकांनी आपल्याकडील दोन हजाराच्या शिल्लक नोटा बाहेर काढणे सुरू केले. काही पेट्रोलपंपावर पहिल्या रात्री ८ वाजेपर्यंत २ हजाराच्या ४ ते ५ नोटा जमा झाल्याचे पंपचालकांनी सांगितले. अनेकांनी डिझेल कार असो वा पेट्रोल कार किंवा सीएनजी टाकी फुल करून घेतल्या. पेट्रोलपंप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व पेट्रोलपंपावर मिळून १०० पेक्षा अधिक २ हजाराच्या नोटा जमा झाल्या आहेत. कालपर्यंत एका पेट्रोलपंपावर दररोज ४ ते ५ नोटा येत असे. आज सायंकाळी तासाभरात ५ पेक्षा अधिक नोटा जमा झाल्या हे विशेष. पुढील आठवड्यात २ हजारच्या नोटा जास्त प्रमाणात व्यवहारात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
२ हजारच्या नोटाच चुकीच्याआता किमान सरकारने हे मान्य केले पाहिजे की, २ हजार रुपयांच्या नोटा आणणे चुकीचे होते. यामुळे चलनावरचाच विश्वास उडण्याची शक्यता आहे. आता पुन्हा लोक घाबरतील. नोटा बदलून देण्यासाठी बँकांना सज्ज करणे आवश्यक आहे. जनधन खात्यांचा वापर देवाणघेवाण करण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. शासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.-देवीदास तुळजापूरकर, महासचिव, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॅईज फेडरेशन