औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, २० हजार चाैरस फुटांचा वाॅटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहे. सभामंडपात एक हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था आणि २० बाय ५० फुटांचे भव्य स्टेज उभारणीसाठी ४० जणांची टीम दिवस-रात्र काम करीत आहे.
नव्या इमारतीच्या नियोजित जागेवरील पाडापाडी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. त्याजागी सपाटीकरण करून भूमिपूजन सोहळ्याच्या मंडप उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. सभापती किशोर बलांडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मिळाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची वेळ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन वाॅटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे.
मंडप उभारणारे रखमाजी जाधव म्हणाले, १६ सप्टेंबरपर्यंत मंडप उभारणीचे काम पूर्ण करावे लागणार आहे. समारंभाला कमी दिवस उरल्याने ४० मजूर दिवस-रात्र काम करीत आहेत. कोरोनाच्या नियमानुसार आसन व्यवस्था केली जाणार आहे.