औरंगाबाद : भारत बंदमुळे मंगळवारी प्रवाशांनी लांबचा प्रवास टाळला. परिणामी, प्रवाशांअभावी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात ‘एसटी’च्या २०२ फेऱ्या रद्द झाल्या. मालवाहतूक करणाऱ्या २ हजार ट्रक जागेवरच उभ्या करण्यात आल्या. त्यामुळे मालवाहतुकीलाही फटका बसला. सिटी बसची प्रवासी संख्या नेहमीपेक्षा रोडावली होती. तर रिक्षा बंदला ६० टक्के रिक्षाचालकांनी प्रतिसाद दिला.
दिवाळीपासून एसटीला प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. परंतु मंगळवारी बस प्रवाशांअभावी रिकाम्याच धावत होत्या. मध्यवर्ती बसस्थानकात सकाळपासूनच शुकशुकाट होता. तुरळक प्रवासी पहायला मिळाले. ३ तास बस उभी राहूनही प्रवासी नव्हते. त्यामुळे बस रद्द करण्याची वेळ आल्याचे आगार व्यवस्थापक एस. ए. शिंदे यांनी सांगितले.
जालना रोडवर नेहमीप्रमाणे रिक्षांची वाहतूक सुरू होती. बंदच्या नावाखाली काही रिक्षाचालकांनी रेल्वेस्टेशनवरून शहरात जाणाऱ्या प्रवाशांकडून अधिक भाडे उकळले. त्याउलट सिटी बसला गर्दी कमी होती. सिटी बसला नेहमीपेक्षा अल्प प्रतिसाद राहिल्याचे स्मार्ट सिटी बसचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी सांगितले. भारत बंदला पाठिंबा म्हणून रिक्षाचालक संघटनांनीही बंद पुकारला होता. त्याला ६० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी सांगितले.
३८३ पैकी केवळ १८१ बस फेऱ्या
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात दुपारी ४ वाजेपर्यंत रोज ३८३ बस फेऱ्या होतात. परंतु मंगळवारी केवळ १८१ फेऱ्या झाल्या. तब्बल २०२ फेऱ्या रद्द झाल्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कंपन्यांचा कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत
शहरात रोज २५०० ट्रकद्वारे विविध मालाची वाहतूक होते. बंदमुळे बहुतांश जणांनी रस्त्यावर ट्रक आणण्याचे टाळले. दिवसभरात केवळ ५०० ट्रकची वाहतूक झाली. तब्बल २ हजार ट्रक आहे त्या ठिकाणीच उभ्या करण्यात आल्या. औरंगाबादेत येणाऱ्या ट्रक बीड, जळगाव, पुणे आदी ठिकाणी थांबविण्यात आल्या. त्यामुळे कंपन्यांना कच्च्या मालाचा पुरवठाही विस्कळीत झाला. औरंगाबादहून माल घेऊन रवाना होणाऱ्या ट्रक रात्री जाण्यास प्राधान्य दिल्याचे औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज खान यांनी सांगितले.