औरंगाबाद : पोलीस आयुक्तालय आणि औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत असलेल्या चार जिल्ह्यांत वर्षभरात २०५ खून झाल्याचे समोर आले. मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंधातून खून होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे. उर्वरित घटना या किरकोळ वादातून घडलेल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत वर्षभरात खुनाच्या ३६ घटनांची, तर औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद ग्रामीण ३६, जालना जिल्ह्यात ३८, बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ४१ खुनाच्या घटना घडल्या. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध एमआयडीसी आहेत. येथे कामानिमित्त बाहेरगावाहून वास्तव्यास आलेल्या लोकांची संख्याही अधिक आहेत. किरकोळ कारणावरून वाद होऊन भांडणे होण्याचे प्रकारही अधिक आहेत. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, सोबत दारू का पीत नाही, म्हणून एका तरुणाची वाळूज एमआयडीसीमध्ये दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटनाही बजाजनगर येथे गतवर्षी झाली होती.
चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत एका माथेफिरूने क्षणिक रागातून एकाच कुटुंबातील तीन जणांची चाकूने भोसकून हत्या केली होती. पाण्याची बाटली दिली नाही, म्हणून चहाटपरी चालकाचा गारखेड्यात खून केला होता. अन्य एका घटनेत गारखेडा परिसरातच दुचाकीचा धक्का लागला म्हणून तरुणाचा खून झाला होता. उल्कानगरीसारख्या उच्चभ्रू वसाहतीत घरगुती कारणावरून पत्नीने पतीचा खून केला. आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वाधिक खून क्षणिक वादातून झाल्याचे पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी नमूद केले.
कट रचून केलेल्या खुनाचे मात्र गूढऔरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत वर्षभरात १६९ खुनाच्या घटना घडल्या. ग्रामीण भागातील सर्वाधिक खून मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. लुटमारीच्या उद्देशाने झालेल्या मारहाणीत खुनाच्या घटनाही घडल्या. सिल्लोड तालुक्यात मे महिन्यात वाईन शॉप मॅनेजरची हत्या लुटमारीदरम्यान झाली होती. या घटनेचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले होते. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतवस्तीवरील नागरिकांचा खून होण्याचेही प्रकार होतात. गतवर्षी खुनाच्या अनेक घटना गाजल्या होत्या. कट रचून खून होणे हे पोलिसांसाठी डोकेदुखी असते. अशा खुनांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागतात. बऱ्याचदा असे खून उघडकीसही येत नाहीत.
औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत २०१९ मध्ये १६९ खुनाच्या घटनांची नोंद झाली. कोणत्याही खुनामागे असलेल्या कारणांपैकी मालमत्तेचा वाद, अनैतिक संबंध हे प्रमुख कारण असते. यातून घडणारे खून बऱ्याचदा पूर्वनियोजित कट रचून के लेले असतात, तर क्षणिक भांडणादरम्यान शस्त्राचा वापर केल्याने अथवा गळा आवळून, बेदम मारहाण केल्याने खून होण्याच्या घटना घडण्याचे प्रकारही अधिक आहेत. याला अपघाती खून म्हटले जाते. - सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक,
वर्षभरातील खून आणि कंसात उघडकीस आलेल्या घटनाऔरंगाबाद ग्रामीण ३६(३६)जालना ३८(३५)बीड ५४(५०)उस्मानाबाद ४१(३८)औरंगाबाद शहर ३६(३५)