औरंगाबाद : मिशन बिगिन अंतर्गत जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. ग्रामीण भागातील शाळा कसे काम करत आहेत. त्याचा धांडोळा घेण्यासाठी जिल्हा परिषेदेच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना २०१८ आकस्मित भेटी आजपर्यंत दिल्या. त्यामुळे शाळांकडून शासन निर्देशांचे पालन योग्य पद्धतीने करून घेत त्यांच्यावर एकप्रकारे अंकुश राहिल्याची माहिती शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.
औरंगाबाद २५२, पैठण २८३, गंगापूर २२८, वैजापूर ३४८, कन्नड २९५, खुलताबाद १५५, फुलंब्री १८८, सिल्लोड २४२, सोयगांव १९० अशा २१८० आकस्मित भेटी अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि विषय तज्ज्ञांनी इयत्ता पहिली ते १२ पर्यंतच्या शाळांना भेटी दिल्या. शिक्षकसंख्या, विद्यार्थी उपस्थिती, आरटीपीसीआर तपासणी केलेली व राहिलेली शिक्षकसंख्या, पटसंख्या व उपस्थित विद्यार्थीसंख्या, विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना, शाळेने निश्चित केलेली वेळ, शिक्षकनिहाय व विषयनिहाय वेळापत्रक, पालकांची अनुमती, शिक्षकांचे कार्यगट, शाळेने केलेली उल्लेखनीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील उपस्थिती वाढली. असल्याचे शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी सांगितले.