छत्रपती संभाजीनगर : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधून महापालिकेला मागील आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला. या निधीतून २१ ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक ठिकाणी कामे रखडल्यामुळे मनपा प्रशासनाने कंत्राटदारांना नोटीसही बजावली.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहराला इंदूरपेक्षा अधिक चांगले शहर बनविण्याची घोषणा केली. त्यादृष्टीने पाऊलसुद्धा उचलले जात आहे. शहरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. सर्वसामान्य नागरिकांसह पर्यटकांना ठिकठिकाणी स्वच्छतागृह सापडत नाहीत. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह महिलांनाही बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातील उड्डाणपूल आणि इतर मोकळ्या जागेत स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या आकांक्षा योजनेतून ११ स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला. तसेच राज्य शासनाच्या इतर योजनेतूनही १० स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. दोन वेळा निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्यांदा प्राप्त झालेल्या निविदा अंतिम करून कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा निश्चित करून पीएमसीमार्फत संकल्पचित्र मंजूर करून देण्यात आले.
परंतु, कंत्राटदारांनी स्वच्छतागृहांची कामे सुरू केली नाही. वेगवेगळ्या अडचणी सांगून कंत्राटदार विलंब करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कंत्राटदार खलील कुरेशी आणि एस. डी. धोंडे पाटील यांना नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जून महिन्यापर्यंत स्वच्छतागृह तयार होणे अपेक्षित होते.