बापू सोळुंके
औरंगाबाद : कोविड महामारीमुळे दीड वर्षात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. या कालावधीत प्रत्येक व्यक्ती कोविड महामारीच्या सावटाखाली जगत होता. त्यामुळे गतवर्षी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण घटले होते. असे असले तरी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील २१२ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे. यातील बहुतेक मुलींचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे.
अल्पवयीन मुला-मुलींसदंर्भात होणाऱ्या गुन्ह्यांची दखल शासन आणि पोलीस यंत्रणा अत्यंत गांभीर्याने घेते. अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी घरातून निघून गेली, अथवा ती हरवल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त होताच या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास सोपविला जातो. तीन महिन्यांत त्या बालकाचा शोध न लागल्यास ही घटना मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाकडे सोपविली जाते. अल्पवयीन बालकांसंदर्भात राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) नुकताच २०२० चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातही औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील गुन्ह्यांची आकडेवारी देण्यात आली.
औरंगाबाद शहरात दीड वर्षात १४३ आणि ग्रामीण भागात ६९ मुलींच्या अपहरणाची नोंद झाली आहे, तर ९ अल्पवयीनांचे खून झाले असून एका अल्पवयीनाने आत्महत्या केल्याचे समोर आले. लहान मुलांना मारहाणीच्या २२३ घटना आहेत. बालकांवरील अत्याचारांच्या आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंद केला जातो. औरंगाबाद ग्रामीणमध्ये गतवर्षी २१ अल्पवयीन मुलींची छेडछाड, विनयभंग झाल्याचे समोर आले.
चौकट
९९ टक्के अल्पवयीन मुला-मुलींचा शोध लावण्यात यश
औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलीस अल्पवयीनांविषयी तक्रार प्राप्त होताच त्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करतात. परिणामी घरातून निघून गेलेल्या अथवा लग्नाच्या आमिषाने, प्रेमप्रकरणातून घर सोडणाऱ्या मुलामुलींचा अवघ्या काही दिवसांत ९९ टक्के बालकांचा शोध लावण्यात यश आले आहे.
---------------
चौकट
खून-०७
खुनाचा प्रयत्न-९
गंभीर दुखापत करणारी मारहाण-२२३
आत्महत्या- २
आत्महत्येचा प्रयत्न-१
गर्भपात-१३
--------------------------------
२०२० मधील बेपत्ता अल्पवयीन मुले-मुली (कंसात शोध लागलेली संख्या)
मुले- ४५ (४५)
मुली-१४३ (१३७)
--------------------------------------
(अल्पवयीन मुलांवर दाखल झाले गुन्हे-चौकट आहे)