छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १४ नोव्हेंबर रोजी सभा होणार आहे. सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी २१३ अधिकारी, १६५८ पोलिस कर्मचारी तैनात असतील.
महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी दुपारी चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थ कंपनीच्या जागेवर सभा होईल. या सभेच्या सुरक्षेसाठी पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. शहराचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार, ग्रामीण पोलिस अधीक्षकांसह ९ पोलिस उपायुक्त, १२ सहायक पोलिस आयुक्त, ४० पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे १५२ अधिकारी, १४४९ कॉन्स्टेबल आणि २०९ महिला पोलिसांचा यात समावेश आहे. याशिवाय केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कंपन्या निवडणुकीसाठी शहरात दाखल आहेत. वेळप्रसंगी त्यांचीही मदत घेतली जाऊ शकते.
जालना रोड दुपारी १२ ते ४ पर्यंत बंदपंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवाय सभेसाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते येणार असल्याने जालना रोडवर वाहतूक कोंडी होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने जळगाव टी पॉइंट ते केम्ब्रिज चौक दुपारी १२ ते ४ या वेळेत सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.