संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना म्हटला की भल्याभल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. गर्दीत जाण्याचे टाळा, असा सल्लाही दिला जातो. पण एसटी महामंडळाचे कोरोनायोद्धा चालक-वाहक स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता दिवसरात्र प्रवासी सेवा देत आहेत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात २ हजार १४४ चालक-वाहक रोज जवळपास १५ हजार प्रवाशांच्या संपर्कात असतात. परंतु त्यांना एसटी महामंडळाकडून ना सॅनिटायझर दिले जाते, ना मास्क दिले जातात. त्यांच्या लसीकरणाचाही विचार होत नसल्याची स्थिती आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून शहरांपासून तर अगदी दुर्गम खेड्यापाड्यातही बससेवा दिली जाते. सण, उत्सवातही एसटीचे चालक-वाहक कर्तव्य बजावतात. गेल्या वर्षभरापासून कोरोना विळखा पडलेला आहे. या विळख्यातही एसटी अवितरपणे सेवा देत आहे. चालक-वाहकांच्या बळावरच ही सेवा सुरू आहे. परंतु त्याच चालक-वाहकांना पुरेसे सुरक्षा कवच देण्याकडेच सध्या दुर्लक्ष होत आहे. हजारो प्रवाशांच्या संपर्कात राहूनही चालक-वाहकांची कोरोना तपासणी होत नाही. प्रत्येक आगारातून मुंबईला चालक-वाहक पाठविले जातात. मुंबईहून आल्यानंतर त्यांच्याही तपासणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. लक्षणे आढळली तर तपासणी असा पवित्रा दिसतो. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. पण आम्हाला लस कधी मिळणार, असा सवाल चालक-वाहकांकडून विचारला जात आहे.
---
वाहक-९३१
चालक-१२१३
रोजच्या फेऱ्या -६,२२२
--
१५ हजार प्रवाशांचा रोज प्रवास
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात ५५० बसगाड्यांचा ताफा आहे. रोज साधारण ६ हजार २२२ फेऱ्या होतात. या सर्व बसमधून जिल्ह्यातून साधारण रोज १५ हजार प्रवासी प्रवास करतात. अनेकदा हा आकडा २० हजारांपर्यंत जातो.
---
लक्षणे आढळली तर तपासणी
प्रवासामध्ये हजारो प्रवाशांबरोबर संपर्क होताे. त्यामुळे चालक-वाहकांना कोरोना होण्याचा सर्वाधिक धोका आहे. पण कोरोना सदृश लक्षणे आढळल्यानंतरच एसटी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यातूनच अनेकदा त्रास वाढल्यानंतर कोरोना तपासणी हाेत असल्याची परिस्थिती आहे.
---
लसीकरण कधी?
१) दररोज हजारो प्रवाशांशी संपर्क होऊनही चालक-वाहकांच्या लसीकरणाचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
२) लस घेण्यास अनेक एसटी कर्मचारी उत्सुक आहेत. परंतु एसटी महामंडळ आणि शासन त्याचा विचार करीत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
------
मास्क, सॅनिटायझरवर होणारा खर्च खिशातून
१)गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सुरुवातीला महामंडळाकडून चालक-वाहकांना मास्क ,सॅनिटायझर देण्यात आले. परंतु नंतर ते देणे बंदच झाले.
२) स्वत:च्या सुरक्षेसाठी चालक-वाहकांना मास्क, सॅनिटायझरवर स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत आहे.
३) एसटी महामंडळाने चालक-वाहकांना किमान काही प्रमाणात कोरोनाची ही सुरक्षा साधने देण्याची मागणी होत आहे.
------
लसीकरणासंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही. ज्या चालक-वाहकांना कोरोनाची लक्षणे आढळतात, त्यांची तपासणी केली जाते. जिल्ह्यात साधारण १५ ते २० हजार प्रवासी रोज प्रवास करतात. मास्क, सॅनिटायझर पूर्वी पुरविले होते. परंतु आता ते कर्मचाऱ्यांना घ्यावे लागते.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
---
मुंबईला कर्तव्यासाठी पाठविण्यात आले. तेथून परत आल्यानंतर साधी कोरोना तपासणी केली नाही. तपासणी न करताच दुसऱ्याच कर्तव्यावर जाण्यास सांगितले जाते. त्यातून आजार वाढला तर कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न आहे.
- एक वाहक
---
दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. कोणाला कोरोना झालेला असेल काहीही सांगता येत नाही. तरीही आम्ही कर्तव्य बजावतो. पण साधा मास्क देण्याचाही प्रशासन विचार करीत नाही. यापुढे तरी त्याचा विचार केला पाहिजे.
- एक चालक