औरंगाबाद : मेडोड्रीन हायपरक्लोराईड, अफाटिनीव, थायलो ग्राफ्टिनबॅन्झाय, गो मेटालिन यासारखे मधुमेह, रक्तदाब व कर्करोगावरील औषधी तयार व विक्री करण्यास केंद्र शासनाने देशात बंदी घातलेली असताना या औषधींची चोरटी आयात करून महाराष्ट्रासह शेजारील राज्यात विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. केंद्र आणि राज्याच्या औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करून २२ लाख रुपयांची औषधी जप्त केल्याचे औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मयूर पार्क परिसरात सोनाई मार्केटच्या गाळा नं.४ मध्ये ही प्रतिबंधित औषधींची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार केंद्र आणि राज्याच्या औषध विभागाने गुरुवारी स्वप्नरूप ड्रॅग्स अॅण्ड फार्मास्युटिकल्सवर छापा टाकला. यात प्रतिबंधित औषधांची आयात व विक्री आणि मोठ्या प्रमाणात आलेल्या औषधींचे लहान लहान पॅकिंग करून विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला.
केंद्राचे औषध निरीक्षक डॉ. सचिन भागवते व औषध प्रशासनाचे निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी विनापरवानगी आयात संदर्भात केंद्र शासन तर पुन्हा पॅकिंग करून विक्री केल्याच्या गुन्ह्यात राज्याचे औषध प्रशासन कारवाई करील, असे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज म्हणाले.
मेडोड्रीन हायपरक्लोराईड, अफाटिनीव, थायलो ग्राफ्टिनबॅन्झाय, गो मेटालिन यासारखे मधुमेह, रक्तदाब व कर्करोगाची औषधांना केंद्र शासनाने विक्रीची किंवा बनवण्याची परवानगी दिलेली नाही. ही प्रतिबंधित औषधी विदेशातून आयात करण्याचा हा प्रकार शहरात झारखंड येथील गुलाब महावीर महातो हा युवक करीत होता. मराठवाड्यातील ही पहिली कारवाई असल्याचे संजय काळे यांनी सांगितले. उशिरापर्यंत मोजमाप सुरू होते.