औरंगाबाद : औरंगाबादच्या प्रणव चौधरीने डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीतील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून वयाच्या २२ व्या वर्षी लेफ्टनंट होण्याचा मान मिळविला आहे. भारतीय लष्कराच्या २/१ गोरखा रायफल्समध्ये त्याची निवड झाली असून, लवकरच तो या पदावर रुजू होईल.
उल्कानगरीत राहणाऱ्या प्रणवने लहानपणापासूनच लष्करात अधिकारी होण्याचे ठरविले होते. त्याचे मामा नरेंद्र पारगावकर हे नौदलात लेफ्टनंट कमांडर होते. त्यामुळे त्याचा या क्षेत्राकडे ओढा होता. प्रणवचे शालेय शिक्षण टेंडर केअर होममध्ये झाले. स. भु. महाविद्यालयातून बारावी विज्ञान, तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी. झाले. २०१७ मध्ये सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या लेखी आणि तोंडी परीक्षेत त्याने यश संपादन केले. या परीक्षेत प्रणव देशातून चौथ्या क्रमांकावर होता. त्याचे वडील सुनील चौधरी हे प्रख्यात कंपनीमध्ये विपणन व्यवस्थापक पदावर काम करतात, आई स्वाती या शिक्षिका व समुपदेशिका आहेत. प्रणवची मोठी बहीण सुरभीचे तंत्रज्ञान पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झाले असून ती बहुराष्ट्रीय कंपनीत फ्लेवर साइंटिस्ट म्हणून नोकरी करते.
इंडिया का लोहा बनता है...डेहराडून येथील अकॅडमीत इंडिया का लोहा बनता है, अशा भावना प्रणवने व्यक्त केल्या. तो म्हणाला की, लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून होतो. हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद वाटतो. प्रणवच्या आई म्हणाल्या की, त्याला लहानपणापासून वेगळे काही करण्याची इच्छा होती. पहिल्या परीक्षेत त्याला यश मिळू शकले नाही, तरी त्याने जिद्द काही सोडली नाही. दिवसरात्र त्याच्या मनात लष्करी सेवेचे ध्येय कायम होते. आम्ही आमचा मुलगा देशसेवेसाठी दिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. आमच्या घराण्यातील प्रणव हा पहिला लष्करी अधिकारी असल्याचे त्याचे वडील सुनील चौधरी म्हणाले.