औरंगाबाद : सर्व अभ्यासमंडळावरील नियुक्त्या दर्जा व गुणवत्तेला प्राधान्य देऊनच करण्यात येईल. नवीन शैक्षणिक धोरणानूसार शिक्षणात मूलभूत बदल होत असून त्या अनुषंगाने आगामी काळात विद्यापीठ प्रशासन काम करेल अशी ग्वाही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. कुलगुरूंच्या आदेशानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ३८ अभ्यास मंडळावरील २२६ नामनिर्देशित सदस्यांसाठी पात्र उमेदवारांकडून ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद, अभ्यास मंडळ आदींच्या निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यानंतर व्यवस्थापन परिषदेची निवडणूक तसेच विविध अधिकार मंडळावरील नामांकन प्रक्रिया होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे. कुलगुरु यांच्या आदेशानुसार विविध अभ्यासमंडळावर नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. चार शाखेंतर्गत प्रत्येक अभ्यास मंडळाच्या सहा सदस्यांचे असे एकूण २२६ जणांचे नामांकन करण्यात येणार आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान १३, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र ५ मानव्यविद्या १३ व आंतर विद्याशाखेतील ६ अभ्यासमंडळांचा समावेश आहे संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठातासमवेत बैठक घेऊन प्रत्येक अभ्यासमंडळावर सहा सदस्य नामनिर्देशित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले.
१० वर्ष अध्यापन अनुभव आवश्यककिमान १० वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेले नामनिर्देशित केलेले ६ अध्यापकांचे नामांकन करणार आहे. यात संबंधित विषयातील विद्यापीठ विभागाच्या पूर्णवेळ अध्यापकांमधून १ अध्यापक असेल, संबंधित विषयातील संलग्न महाविद्यालयांमधील किंवा पदव्युत्तर केंद्रांतील मान्यताप्राप्त पदव्युत्तर अध्यापकांमधून २ अध्यापक, विभागप्रमुख नसलेले ३ अध्यापक असणार आहे. परिपत्रकात दर्शविल्याप्रमाणे पात्र असणा-या इच्छूक व्यक्तींना १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत दरम्यान अर्ज करता येणार आहे.