सिल्लोड : तालुक्यातील घाटनांद्रा व खुल्लोड या दोन ठिकाणी चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील १२ प्रवास्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. घाटनांद्रा येथे क्रूझर जीप उलटून ५ प्रवासी आणि खुल्लोड येथे पीक अप उलटून १८ प्रवासी जखमी असून हे अपघात दुपारी २ वाजेच्या दरम्यान झाले.
अधिक माहिती अशी की, घाटनांद्रा येथून दहाव्याचा कार्यक्रम आटोपून पाचोरा येथे जात असताना तीडका घाटात टायर फुटल्याने क्रूझर जीप ( क्र. एम.एच. २८ सी. ४७१० ) उलटली. यात ५ प्रवासी जखमी झाले. तुळसाबाई आनंद घोरपडे ( ५० रा. सावरखेडा), ज्योती गणेश खेडकर ( ३२, रा.औरंगाबाद ) अनिता शिवाजी साळुंके ( ४०, रा. औरंगाबाद ) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले. तर उशाबाई ज्ञानेश्वर शेळके ( ४० रा. पाचोरा ) ताराबाई धनराज पाटील (४०, रा. वाळीशेवाळा ता.पाचोरा ) हे किरकोळ जखमी असल्याने यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आले.
तर दुसरा अपघात सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथे झाला. उंडणगाव येथून खुल्लोड येथे लग्नासाठी प्रवासी घेऊन जाणारा एक पीक अप वळण रस्त्यावर उलटला. यात १८ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील ९ प्रवास्यांची प्रकृती गंभीर आहे. यात कौसाबाई नरवाडे, मानाबाई विष्णू लांडगे, ओम मारोती सपकाळ, , निलेश प्रभाकर लांडगे, शामराव रामाजी धनवई, संगीता देविदास माळेकर, रुखमनबाई महादेव सपकाळ, संगीता अनिल पैठणकर, साक्षी अशोक सोनवणे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. तर गौरी शेषराव नरोडे, रत्ना अरुण मोकासे, आदित्य अरुण मोकासे, पुष्पां पांडुरंग धनवई, ऋषिकेश कृष्णा खोडके, राधा गजानन सपकाळ, सुखदेव रामभाऊ सनांसे, समर्थ गणेश खेडकर, शुभम दिलीप तायडे हे किरकोळ जखमी आहेत.
यावेळी किशोर अग्रवाल, रुग्ण कल्याण समिती सदस्य हाजी मोहम्मद हनीफ, सुदर्शन अग्रवाल ,राजु गौर, प्रशांत शिरसागर. विनोद भोजवानी, गणेश डकले, सुनील इंगळे,फहीम पठाण,अशोक गायकवाड यांनी जखमींना औरंगाबाद येथे हलविण्यात मदत केली.