लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील मालमत्ता सर्वेक्षणावर १० ते १२ कोटी रुपये खर्च करण्याऐवजी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपा आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांकडून दीड महिन्यापूर्वी मालमत्ता सर्वेक्षण सुरू केले. ५ जून ते ७ जुलैपर्यंत शहरातील तब्बल २४ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांना नवीन कर लावण्याचे आव्हान मनपासमोर राहणार आहे. राजकीय मंडळींनी या प्रक्रियेला साथ दिल्यास मालमत्ता करातून मनपाला दरवर्षी तब्बल ३०० कोटी रुपये प्राप्त होऊ शकतात.मागील तीन दशकांत मनपाने मालमत्तांचे सर्वेक्षणच केलेले नाही. नगर परिषदेने, महापालिकेने जुन्या घराला लावलेला कर आजही सुरू आहे. या घराच्या जागेवर आज टोलेजंग इमारत उभी आहे. या नवीन इमारतीला महापालिकेने करच लावलेला नाही. त्यामुळे दरवर्षी प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीसाठी कितीही प्रयत्न केले तर ८० कोटींपेक्षा एक रुपयाही जास्त वसूल होत नाही. यंदा राजकीय मंडळींनी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ३५० कोटी दिले आहे. आतापर्यंत ३० कोटी रुपये वसूल झाले आहेत. मालमत्ता कर महापालिकेचा मोठा आर्थिक कणा आहे. हा कणाच पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शंभर टक्के सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. ५ जूनपासून कंत्राटी आणि मनपाच्या २६९ कर्मचा-कडून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. यासाठी वार्डनिहाय पथक तयार करण्यात आले आहे. पथक घरोघरी जाऊन मालमत्तांची मोजणी करीत आहे. प्रत्येक पथकाला दररोज २० मालमत्तांची मोजणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.मालमत्ताधारकांकडून घेण्यात आलेल्या कागदपत्रांचे त्याच दिवशी स्कॅनिंग केले जात आहे. सुरुवातीला रमजान महिना असल्याने ७ हजार ८१० मालमत्तांची मोजणी झाली. त्यानंतरच्या पंधरा दिवसांत पथकांनी जोमाने काम केल्याचे दिसून येत आहे. ५ जुलैपर्यंत १२ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतरच्या दोनच दिवसांत साडेचार हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३२ दिवसांत २४ हजार ५०२ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रोजची आकडेवारी आयुक्तांकडून तपासली जात आहे. आयुक्तांचा या मोहिमेवर वॉच असल्याने पथके जबाबदारीने काम करीत आहेत.
२४ हजार मालमत्तांचा सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:10 AM