औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यावरून शनिवारी २४६ टन कांदे घेऊन पहिली किसान रेल्वे कोलकात्याला रवाना झाली. देशात किसान रेल्वेची सुविधा सुरू झाल्यानंतर औरंगाबादहून पहिल्यांदाच ही रेल्वे धावली. कृषी मालाची सुरक्षित आणि जलद वाहतूक सेवा देण्यासाठी किसान रेल्वेच्या माध्यमातून पाऊल पडले आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस ५ जानेवारी २०२१ रोजी नगरसोल येथून धावली होती. त्यानंतर येथून अनेक किसान रेल्वे धावल्या. त्यातून संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरताला, फातुहा आदी ठिकाणी माल पाठविण्यात आला. किसान रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किलोमीटर प्रती तास या वेगाने धावतात. यामुळे शेतमाल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स - टॉप टू टोटल’ च्या अंतर्गत किसान रेल्वेंद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी ही दर सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे त्यास प्रतिसाद वाढत आहे.
५.६० लाखांचे उत्पन्न
औरंगाबादहून रवाना झालेल्या पहिल्या किसान रेल्वेच्या माध्यमातून ५ लाख ६० हजारांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे. ही वाहतूक करण्यासाठी ११ लाखांवर रुपये लागले असते; परंतु किसान रेल्वेतून वाहतूक केल्याने ५० टक्के सवलत मिळाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
फोटो ओळ...
औरंगाबादहून शनिवारी कांदा घेऊन पहिली किसान रेल्वे धावली. या रेल्वेत माल ठेवताना मजूर.