औरंगाबाद : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक ठाण्यातील २५ टक्के पोलिसांनी रस्त्यावर गस्त घालावी, असा स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी ठाणेदारांना दिला आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून शहरात वाहनचोरी, घरफोडी, दुकानफोडी आणि वाटमारीचे प्रकार वाढले आहेत. सोनसाखळी चोरी रोखण्यात पोलिसांना यश आले असले तरी मंगळसूत्र चोरटे पुन्हा सक्रिय होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर डॉ. गुप्ता यांनी रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांत कार्यरत मनुष्यबळाच्या सुमारे २५ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना गस्तीचे काम सोपविले जात आहे. दोन दिवसांपासून काही पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली आहे.
शहरात चार्ली पोलिसांची आणि बीट मार्शलची गस्त बंद करून बीट हवालदारांवर गस्त सोपविण्यात आली होती. आता गस्तीकरिता स्वतंत्र कर्मचारी देण्यात येत असल्याने त्यांच्यावर अन्य जबाबदारी नसेल. यामुळे ते निर्धोकपणे गस्त करू शकतील. यातील काही कर्मचारी दुचाकीने तर काही पोलीस मोबाईल व्हॅन आणि जीपमधून गस्त घालतील.