लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शहरी भागांमधील खाजगी दवाखान्यांमध्ये २४.७ टक्के सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण असून ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये हे प्रमाण १६.७ टक्के असल्याची गंभीर बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातील अहवालातून स्पष्ट झाली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अभियानांतर्गत देशभरात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाचा २०१५-१६ चा अहवाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अत्यंत गंभीर बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात सिझेरियन प्रसुतीद्वारे जन्माचे प्रमाण शहरी भागात २६.३ टक्के असून ग्रामीण भागात १५.२ टक्के आहे. सरासरी २०.१ टक्के सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण आहे. विशेष म्हणजे २००५-०६ मध्ये ११.६ टक्के होते. म्हणजेच दिवसेंदिवस सिझेरियनच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. २०१५-१६ या वर्षात राज्यात शहरी भागात ३८.४ टक्के खाजगी दवाखान्यांमध्ये सिझेरियनचे प्रमाण होते. तर ग्रामीण भागात २७.५ टक्के हे प्रमाण होते. राज्यातील खाजगी दवाखान्यातील सिझेरियनचे सरासरी ३३.१ टक्के प्रमाण होते. २००५-०६ मध्ये या तुलनेत २२.३ टक्के प्रमाण होते. खाजगी दवाखान्यांच्या तुलनेत सरकारी दवाखान्यांमध्ये हे प्रमाण कमी दिसून आले आहे. शासकीय दवाखान्यात यावर्षात शहरी भागात १६.६ टक्के तर ग्रामीण भागात १०.५ टक्के असे सरासरी १३.१ टक्के प्रमाण होते. २००५-०६ मध्ये सरकारी दवाखान्यात हे प्रमाण ११.६ टक्के होते. परभणी जिल्ह्यात सिझेरियन प्रसुतीद्वारे झालेल्या जन्माचे प्रमाण शहरी भागात १८.८ टक्के असून ग्रामीण भागात ११.४ टक्के आहे. सरासरी १३.७ टक्के हे जिल्ह्यातील सिझेरियन प्रसुतीद्वारे झालेल्या जन्माचे प्रमाण आहे. जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यांमध्ये या वर्षात सिझेरियन जन्माचे २४.७ टक्के प्रमाण असून ग्रामीण भागात हे प्रमाण १६.७ टक्के आहे. सरासरी १९.९ टक्के खाजगी दवाखान्यांमध्ये सिझेरियनचे प्रमाण आहे. त्या तुुलनेत सरकारी दवाखान्यातील सिझेरियनचे प्रमाण कमी आहे. या वर्षात सरकारी दवाखान्यात शहरी भागात १५.६ टक्के तर ग्रामीण भागात १०.९ टक्के असे एकूण १२.१ टक्के सिझेरियन जन्माचे प्रमाण आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यांच्या तुलनेत शासकीय दवाखान्यात सिझेरियन जन्माचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खाजगी दवाखान्यात २५ टक्के सिझेरियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:23 AM