औरंगाबाद : पानदरिबा येथे श्री जागृत हनुमान मूर्तीच्या तेजोत्तारण विधी व पुनर्प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सोमवारी सांगता झाली. ही मूर्ती ४०० ते ५०० वर्षांपूर्वीची असल्याचा पुरातत्त्व विभागाने दावा केला आहे. याबद्दल पुरातत्त्व विभागाने जागृत हनुमान मंदिरास प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
शहरात पानदरिबा येथे पूर्व दिशेकडे तोंड असलेल्या मंदिरात दक्षिणमुखी मूर्तीचे एकमेव उदाहरण आहे. दक्षिणमुखी मूर्तीतून जवळपास अडीच क्विंटल शेंदूर निघाला असून, त्याचे विधिवत पूजन करून गंगेस अर्पण केला जाणार आहे. २०० वर्षांपूर्वी व्यास परिवार या मंदिरात पूजा व देखभाल करत असल्याचे सतीश व्यास यांनी सांगितले. १० ते १६ फेब्रुवारीपर्यंत व्यास परिवारातर्फे सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद आदींचे आयोजन केले आहे. या सोहळ्यादरम्यान कैलास वर्मा यांचे व आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त मनोज महाराज गौड यांच्या वाणीतून सुंदरकांड झाले. बुधवार, १६ फेब्रुवारी रोजी श्री जागृत हनुमान मूर्तीस लघुरुद्र अभिषेक, महाआरतीनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री जागृत हनुमान मंदिराचे सतीश व्यास, मिथुन व्यास, दीपक व्यास, पप्पू व्यास, रितेश व्यास, सुनील ओझा यांनी केले.