औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून महापालिकेतर्फे स्मार्ट बससंदर्भात निव्वळ घोषणांचा पाऊस पाडण्यात येत होता. अखेर २३ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात शहरातील १४ मार्गांवर २५ बसेस धावणार असल्याची घोषणा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ट्विटरवर केली. त्यामुळे बसेस खरोखरच धावणार हे निश्चित झाले आहे. शहर बसचे प्रवास भाडेही अत्यंत कमी ठेवण्यात आले असून, दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त ५ रुपये आकारण्यात येतील. शहराच्या आसपासच्या छोट्या-छोट्या गावांपर्यंत स्मार्ट बस जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
दहा वर्षांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला होता. औरंगाबादकरांना शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जायचे असल्यास अॅपे, रिक्षाचालक प्रचंड लूट करीत असत. अवाच्या सव्वा पैसे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत होता. स्मार्ट सिटी योजनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र शासनाने भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत महापालिकेने तब्बल १०० बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील २५ बस मनपाला प्राप्त झाल्या आहेत. या प्रकल्पावर महापालिकेने स्मार्ट सिटीतील किमान ३६ कोटी रुपये खर्च केले आहेत.
२३ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात २५ बसेस १४ मार्गांवर धावणार आहेत. पहाटे पाच वाजेपासून ही सेवा एस. टी. महामंडळ देणार आहे. रात्री १० वाजेपर्यंत या बसेस धावतील. सर्व प्रमुख रस्त्यांवर पाच ते दहा मिनिटांमध्ये नागरिकांना शहर बस उपलब्ध होईल, यादृष्टीने एस. टी. महामंडळाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शहराबरोबरच वाळूज, रांजणगाव, बजाजनगर, हर्सूल-सावंगी, चिकलठाणा, नक्षत्रवाडी, सातारा-देवळाई, हिंदुस्थान आवासपर्यंत बसेस धावणार आहेत.
काही जागा आरक्षितस्मार्ट बसेसमध्ये स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. एस. टी. महामंडळाप्रमाणे सर्व सवलती देण्यात आल्या आहेत. स्मार्ट बस ३२ आसनी असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, पॅनिक बटन, अग्निशमन यंत्रणा बसविलेली आहे.