छत्रपती संभाजीनगर : बालिकेवर अत्याचार व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बाबूराव उकडू संगेराव (३६, रा. दिवशी बुद्रुक, तालुका भोकर, जिल्हा नांदेड) याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा कायम (कन्फर्म) होण्यासाठी खंडपीठात आली असता न्या. व्ही.व्ही. कंकणवाडी आणि न्या. अभय वाघवसे यांनी आरोपीची फाशीची शिक्षा रुपांतरित करून त्याला शिक्षा पूर्ण होईपर्यंत कुठलीही सूट न देता २५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
मालकाच्या ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार व अनैसर्गिक कृत्य करून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली भोकरच्या सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली होती. आरोपी ज्या मालकाच्या म्हशी चारत होता, त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीवर २० जानेवारी २०२१ रोजी अत्याचार करून तिचा खून केल्याचा आरोप बाबूराववर होता. भोकरच्या सत्र न्यायालयाने आरोपीला २३ मार्च २०२१ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा कायम होण्यासाठी शासनातर्फे खंडपीठात ‘कन्फर्मेशन केस’ आली होती तर आरोपीतर्फे अपील करण्यात आले होते. त्यावर खंडपीठात एकत्रित सुनावणी झाली. आरोपीने केलेला गुन्हा पूर्वनियोजित नव्हता. त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही. ‘डीएनए’चा पुरावा संशयास्पद आहे, आदी बचावाचे मुद्दे आरोपीतर्फे ॲड. रेबेका गोन्साल्वीस (मुंबई) यांनी मांडले.
सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता राजेंद्र डासाळकर यांनी परिस्थितीजन्य पुरावा, तसेच बालिकेच्या शवापासून काही अंतरावर आरोपी नग्नावस्थेत आढळला होता. आरोपीने दोन साक्षीदारांसमक्ष दिलेली गुन्ह्याची कबुली. बालिकेच्या शवाजवळून पोलिसांनी जप्त केलेले आरोपीचे कपडे, अंतर्वस्त्र, मोबाईल, इ. पुराव्यांकडे खंडपीठाचे लक्ष वेधले.