छत्रपती संभाजीनगर : सुमारे २५० कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी जितेशकुमार हिन्होरिया प्रेमजीभाई याचा औषधोपचार पूर्ण होईपर्यंत ‘डीआरआय’ च्या ताब्यात ठेवण्याची परवानगी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही. मुसळे यांनी सोमवारी दिली.तर याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी संदिप शंकर कमावत याची ‘डीआरआय’ च्या विनंतीनुसार न्यायालयीन कोठडीत (हर्सुल कारागृहात) रवानगी करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस मोमीन यांनी दिला.
गुजरात पोलिस आणि महसूल गुप्तचर संचलनालय (डीआरआय) च्या पथकाने शहरात छापा मारुन तब्बल २५० कोटी रुपयांचे ४४ किलो कोकेन, मेफेड्रोन आणि केटामाईन या अंमली पदार्थांचा साठा रविवारी जप्त केला होता. त्या गुन्ह्यात दोन न्यायालयांनी वरीलप्रमाणे स्वतंत्र आदेश दिले आहेत.
जितेशकुमार याने टॉयलेटमध्ये काचेच्या तुकड्याने गळा व हाताच्या नसा कापल्यामुळे त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर कमावतला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. डीआरआयच्या पथकाने सकाळी जितेशकुमारला रुग्णालयातून व्हीसी व्दारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुसळे यांच्या न्यायालयात हजर केले. मात्र जितेशचा आवाज येत नव्हता व तो बेशुद्ध असावा, असे निरीक्षण नोंदवून संबंधित अधिकाऱ्यांना अर्ज दाखल करुन त्यांचे म्हणणे सादर करण्याचे न्यायालयाने सूचित केले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दुपारी अर्ज दाखल केला. आरोपी न्यायालयात व्यक्तीश: हजर झाल्याशिवाय आदेश करता येणार नसल्याचे न्या. मुसळे यांनी स्पष्ट केले.
मात्र, जितेशचा औषधोपचार चालू असेपर्यंत त्याला डीआरआय’ च्या ताब्यात ठेवण्याची परवानगी दिली. त्याचा औषधोपचार पूर्ण होताच डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासह त्याला न्यायालयात हजर करुन पुढील आदेश घ्यावा, असे आदेशात म्हटले आहे. तर दुसरा आरोपी कमावत याला रविवारी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्याला दुसऱ्यांदा रिमांडसाठी न्या. मुसळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, आरोपीचा हा दुसरा रिमांड असल्यामुळे कमावतला विशेष न्यायालयात हजर करण्याची परवानगी न्या. मुसळे यांनी दिली.