छत्रपती संभाजीनगर : अब्जावधी रुपयांच्या अमली पदार्थांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मूळ गुजरातचा असलेला जितेशकुमार हिन्होरिया यानेच संकल्पना पुरवली. त्याचा साथीदार संदीप कमावतचे कुटुंब शहरात स्थायिक असले तरी त्याचेही मूळ गाव राजस्थानात असून, त्याचा मित्र परिवार सीमावर्ती भागात मोठा आहे. देशातले सर्वाधिक ड्रग्ज एकत्र येत तेथे ‘डंप’ केले जाते. दोघांमध्ये त्याच नेटवर्कचा धागा येथे जुळला.
गेल्या ३ वर्षांत तेथे १० हजार कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्तीमुळे तेथील माफियांनी अन्य राज्यांमध्ये घुसून कारखान्यांत ड्रग्ज निर्मितीचा घाट घातला व हिन्हेारियादेखील त्याचाच भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले.शुक्रवारी गुजरात गुन्हे शाखा, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने (डीआरआय) हिन्होरिया, कमावतला ड्रग्ज निर्मिती प्रकरणात ताब्यात घेतले. जवळपास २५० कोटी रुपयांचे ४४ किलो अमली पदार्थ जप्त केले, तर २५० कोटींचा कच्चा माल कारवाईत सापडला. डीआरआय पुढची साखळी पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच हिन्होरियाने संतापाच्या भरात गळा व नस कापून घेतली. परिणामी, पथकाच्या मनसुब्यांवरच पाणी फेरले गेले. दरम्यान, हिन्होरियाने जबाब दिला असून, त्या आधारे पथक कारवाई करू शकते, अशी शक्यता आहे.
गुजरातमधील जाळे-ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान गुजरात पोलिसांनी जवळपास ५ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त करत १०२ विक्रेत्यांना अटक केली. सीमावर्ती भागात हेरॉइन व अन्य अमली पदार्थांचे डंपिंग केले जाते.-सप्टेंबर २०२३ मध्ये कच्छ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय बाजारात ८०० कोटींची किंमत असलेली कोकेनची ८० पाकिटे जप्त.-ऑगस्ट महिन्यात सापडलेल्या २५७.६४५ किलो चरससदृश अमली पदार्थाचे गुजरात कनेक्शन सिद्ध.-ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबई पोलिसांनी कमावतच्या कारखान्याप्रमाणेच गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील कारखान्यावर छापा टाकत ५१३ किलो एमडी ड्रग्स जप्त.-डिसेंबर २०२२ मध्ये वडोदरा भागात ७८ कोटी रुपयांचे १४३ किलो मेफेड्रोन जप्त-नोव्हेंबर २०२१ मध्ये द्वारका जिल्ह्यात ३१३.२५ कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले.
दोघांनी स्वत:चे नेटवर्क वापरलेराजस्थान व गुजरात कनेक्शनचा हिन्होरिया व कमावतला ड्रग्ज रॅकेटमध्ये फायदा झाला. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात बनविलेला माल छोट्या स्वरूपात पाठवला जायचा. गुजरातमध्ये तपास यंत्रणांच्या कारवायांत वाढ झाल्यानंतर अन्य राज्यांत कारखाने हलवले गेले. नुकतेच राज्यात हे कारखाने उघडकीस यायला लागले. देशभरातील कारखान्यातून आलेले अमली पदार्थ ‘डंप’ करून मुंबई व नंतर राज्यभरात इतरत्र पाठवले जाते. त्यामुळेच दोघांनी स्थानिक पातळीवर किरकोळ विक्री टाळली होती.
हिन्होरिया कंपनीचा सल्लागारवाळूजच्या ‘त्या’ केमिकल कंपनीने सुरुवातीपासून हिन्होरियासोबतचा संबंध नाकारला. मात्र, हिन्होरीया त्याच कंपनीसाठी रासायनिक सल्लागार म्हणून काम करतो व एमडी, मेफेड्रोनची निर्मिती करत होता, असे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे कागदोपत्री नमूद केले आहे. त्यामुळे डीआरआय आता त्या कंपनीवर कारवाईची दिशा कशी ठरवते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कंपन्यांच्या ऑर्डर तपासणारपुढील तपासात आता तपास यंत्रणांकडून कमावतच्या पैठणच्या महालक्ष्मी इंडस्ट्रीसह वाळूजच्या कंपनीचे जवळपास दोन वर्षांतले रेकॉर्ड तपासले जाणार आहे. या कंपन्या अन्य औषधी निर्मितीसाठी वैध असल्या तरी त्या आडून ड्रग्च बनवित होत्या. त्यामुळे यांनी कंपनीत कुठल्या प्रकारचे रसायन ऑर्डर करत होते, किती करत होते, त्याचे यांच्याकडे परवाने आहेत का याचेही रेकॉर्ड तपासले जाणार आहे. यामुळे परिसरातील अन्य औषधी कंपन्यांचेही धाबे दणाणले आहे.