विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसिंचन योजनेसह शिवना टाकळी, वाकोद कानडगाव येथील सुमारे २५०० कोटींच्या सिंचन योजनांच्या कामांना कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे १८ महिन्यांपासून घरघर लागली आहे.
ब्रम्हगव्हाण योजनेचे काम कंत्राटदारांनी संथगतीने केल्यामुळे योजनेची किंमत वाढत गेली आहे. योजनेचा टप्पा क्र. २ च्या सुधारित अंदाजपत्रकाला जलसंपदा विभागाकडून अद्याप मान्यताच मिळालेली नाही, तर तिसऱ्या टप्प्यातील योजनेला अजून मुहूर्तच लागलेला नाही. या दोन्ही योजनांसोबतच फुलंब्रीतील वाकोद, सिल्लोडमधील शिवना-टाकळी, कन्नड तालुक्यातील रंगारी देवगाव या योजना देखील रेंगाळल्या आहेत.
शिवना-टाकळीचा प्रकल्प अधांतरी आहे. हा प्रकल्प २०० ते २५० कोटींच्या आसपास आहे. त्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, पुढील काम मार्गी लागलेले नाही. कालव्याचे काम रखडलेले आहे.
वाकोदचे नवीन काम प्रस्तावित केले आहे. नदीपात्रातून जोडणी देणे प्रस्तावित असून, त्याचे अंदाजपत्रक केलेेले नाही. हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. स्थानिक पातळीवरच त्या प्रकल्पाचे काम रखडलेले आहे, तर कानडगाव पुनर्वसन प्रकल्प रखडला आहे. देवगांव-रंगारी येथील कानडगाव पुनर्वसन प्रकल्प आहे, त्याला १०० कोटींच्या आसपास खर्च लागणार आहे. कानडगाव पूर्ण नव्याने वसविण्यात येणार आहे.
चौकट...
सिंचन योजना आणि खर्च
ब्रम्हगव्हाण टप्पा क्र.२- १ हजार कोटींवर
ब्रम्हगव्हाण टप्पा क्र. ३- कायगाव ते लासूर १ हजार कोटी
फुलंब्री वाकोद- अद्याप काही तयारी नाही
शिवना टाकळी- २५० कोटींवर
रंगारी देवगाव - १०० कोटींवर
चौकट..
नऊ प्रकल्पांचा नवीन आराखडा
जिल्ह्यातील एक हजार हेक्टर जमीन येत्या दोन वर्षांत सिंचनाखाली आणण्यासाठी ९ लघु प्रकल्पांचा आराखडा लघु पाटबंधारे विभागाने तयार केला आहे. यासाठी ६०० कोटींच्या आसपास रक्कम भूसंपादनासाठी लागणार आहे, असे लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी सांगितले. तसेच ब्रम्हगव्हाणसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच मिळेल, असा दावाही त्यांनी केला. देवगाव रंगारी, बनोटी, शिवनाटाकळी, सावळदबारा, वनगांवपोखरी, सोनखेडा, थोरातसावंगी, बरबंडा हे औरंगाबाद जिल्ह्यातील, तर जालना जिल्ह्यात पाटोदा येथे लघुप्रकल्प बांधण्यात येणार आहे.