औरंगाबाद : रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री व शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे हे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या पैठण विधानसभा मतदारसंघच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ठीक-ठिकाणी त्यांचे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे. आज ते बिडकीन येथे आले असताना शिवसैनिकांकडून चक्क 251 किलोच्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले.
नव्याने मंत्रीपद मिळालेले सर्वच मंत्री आपल्या मतदारसंघात मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. यासाठी होर्डिंग्ज, पुष्पगुच्छ आणि मोठ-मोठ्या पुष्पहारासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरु आहे.
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळालेले संदीपान भुमरे हे सुद्धा आज पैठण दौऱ्यावर आहेत. तर बिडकीन येथे भुमरे यांचे आगमन होताच शिवसेनेचे स्थानिक नेते मनोज पेरे यांच्याकडून चक्क 251 किलोच्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले. या महाकाय पुष्पहार अर्पण करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आले. त्यामुळे हा पुष्पहार परिसरात चर्चेचा विषय ठरला.