औरंगाबाद : महानगरपालिकेच्या शाळांमधील २५५ स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, ४९ नवीन स्वच्छतागृहांची गरज असल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त, प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र निकम यांनी दिली. पालिकेच्या शाळांच्या इमारतींची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. काही इमारती धोकादायक झाल्या असून, स्लॅब पडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने इमारतींचे सर्वेक्षण करून अहवाल मागविला होता. मात्र शाळा इमारतींची दुरुस्ती अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी गारखेडा परिसरातील एका शाळेला भेट दिली होती. यावेळी शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी शाळेच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी, प्रत्येक शाळेला पाण्याची सोय करून द्यावी, असे आदेश दिले होते. उपायुक्त निकम यांनी मुख्याध्यापकांमार्फत स्वच्छतागृहांचे अहवाल मागविले होते. उपायुक्त निकम म्हणाले, पालिकेच्या एकूण ७० शाळा असून, त्यात ३७४ स्वच्छतागृह आहेत. यापैकी केवळ ११९ वापरात असून, ४९ नवीन स्वच्छतागृहांची मागणी विविध शाळांकडून या अहवालात करण्यात आली आहे. नवीन तसेच जुन्या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीच्या कामाची संचिका शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्याकडे पाठविण्यात आली असून, लवकरच दुरुस्तीची कामे करण्यात येतील.
२५५ शाळांच्या स्वच्छतागृहांची झाली पडझड
By admin | Published: July 29, 2016 1:05 AM