औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी अखिल भारतीय कोट्याची पहिली फेरीत शुक्रवारी पूर्ण झाली. राज्य कोट्याची पहिली फेरी शनिवारी पूर्ण होणार आहे. आतापर्यंत घाटीत एमडी, एमएस अभ्यासक्रमासाठी २६ कनिष्ठ निवासी-१ डाॅक्टर रुजू झाले आहेत, अशी माहिती उपाधिष्ठाता डाॅ. शिराझ बेग यांनी दिली.
घाटीत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या (एमडी, एमएस) १९५ जागा आहेत. त्यापैकी केंद्रीय कोट्याला ९८ आणि राज्य कोट्याला ९७ जागा आहे. राज्य कोट्याची निवड यादी ३ ऑक्टोबरला जाहीर झाल्यावर ४ ऑक्टोबरपासून प्रवेशाला सुरुवात झाली. शुक्रवारपर्यंत या कोट्यातून १६ प्रवेश झाले. या फेरीत प्रवेश निश्चितीसाठी शनिवारपर्यंत मुदत आहे. ‘ऑल इंडिया’ कोट्यातून प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदत होती. शुक्रवारी दुपारपर्यंत या कोट्यातून १० प्रवेश झाले होते.
अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे कागीनाळकर यांच्या मार्गदर्शनात एमसीसी (ऑल इंडिया कोटा) व राज्य कोट्यासाठी ‘सीईटी सेल’कडून राबवण्यात येणाऱ्या या फेरीसाठी प्रवेश समिती, सीईटी सेलचे प्रभारी डाॅ. गणेश मिटूरकर, डाॅ. अनिल गायकवाड, डाॅ. अमरनाथ अवरगावकर, डाॅ. अश्फाक, सुनीता सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी प्रक्रिया पूर्ण करून घेत आहे.
अशा आहेत १९५ जागाबधिरीकरणशास्त्र २५, शरीरक्रियाशास्त्र ३, जीवरसायनशास्त्र २, त्वचारोग २, ईएनटी ४, फाॅरेन्सिक मेडिसीन ३, मेडिसीन २०, सर्जरी २०, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र २१, नेत्ररोग ८, विकृतीशास्त्र १४, औषधशास्त्र ३, फिजिओलाॅजी ३, वार्धक्यशास्त्र ५, सूक्ष्मजीवशास्त्र १३, कम्युनिटी मेडिसीन १२, मनोविकृतीशास्त्र ३, क्ष किरण १३, रेडिओ थेरपी २, आदी २१ विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १९५ जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत.