औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावात लसीकरणासाठी केंद्रांवर नागरिकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. पण, लसीअभावी माघारी जाण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे. दोन, चार दिवसाला लस येतात आणि काही दिवसांत संपूनही जातात, अशी औरंगाबादची अवस्था आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयास रविवारी कोविशिल्डचे ९४ हजार ६०० डोस मिळाले. यात औरंगाबादसाठी २६ हजार डोस मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी दिली.
औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गंत औरंगाबादसह जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या चार जिल्ह्यांसाठी रविवारी ९४ हजार ६०० डोस मिळाले. यातून औरंगाबाद शहरासाठी १३ हजार आणि ग्रामीण भागासाठी १३ हजार डोस देण्यात येणार आहेत, असे डाॅ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले. हे डोसही दोन ते तीन दिवसांत संपून जातील. त्यामुळे लसीची प्रतीक्षा करण्याचीच नामुष्की औरंगाबादकरांवर कायम राहणार असल्याचे दिसते.
२,१५० काेव्हॅक्सिनचे डोस
आरोग्य उपसंचालक कार्यालयास रविवारी काेव्हॅक्सिनचेही २ हजार १५० डोस मिळाले आहेत. या डोसच्या मागणीनुसार रुग्णालय, लसीकरण केंद्रांना पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड लसीच्या तुलनेत काेव्हॅक्सिन लसीचा नेहमीच कमी पुरवठा होत आहे. त्यामुळे या लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसऱ्या डोसची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.
चौकट
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि. ८) ३ लाख ८८ हजार ६०७ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. यातील ८८ हजार १५९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे आतापर्यंत ४ लाख ७६ हजार ७६६ डोस देऊन झालेले आहेत.