संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून मराठवाड्यात अवयवदान थांबले आहे. परिणामी, मराठवाड्यात तब्बल २६४ जणांना किडनी मिळण्याची प्रतीक्षा आहे, तर ४६ जणांना यकृत हवे आहे. किडनीअभावी रुग्णांना मरणयातना सहन करीत डायलिसिसवर एक-एक दिवस काढावा लागत आहे.
मराठवाड्यात औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. वर्षभरानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण झाले. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण झाले. मराठवाड्यात २०१६ पासून ते २०१९ या कालावधीत २५ ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले आहे. त्यातून अनेकांना नवीन आयुष्य मिळाले; परंतु कोरोनामुळे अवयवदानाला खीळ बसली. दीड वर्षे उलटूनही आतापर्यंत एकही अवयवदान झालेले नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत कमी झाला आहे. रुग्णसंख्याही घटली आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण करणे आता शक्य होणार आहे. एखादा रुग्ण ब्रेनडेड असल्याचे जाहीर झाला तर नातेवाईकांच्या परवानगीनंतर अवयवदान, प्रत्यारोपण करण्यासाठी शहरातील रुग्णालये सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
----------
अवयवदान आता शक्य
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे आता कोणी जर ब्रेनडेड असल्याचे निदान झाले तर अवयवदान करता येईल. सर्व रुग्णालये अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी सज्ज झाले आहे.
- डाॅ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, झेडटीसीसी
------
अवयवदानाचे प्रमाण
वर्ष ---- अवयवदान
२०१६ ------ ९
२०१७ ------ ६
२०१८ ------ ७
२०१९ ------ ३
२०२० ------ ०
२०२१ ------ ०
एकूण ------ २५