औरंगाबाद : खंडपीठ परिसरात उभारण्यात आलेल्या लॉयर्स चेंबर्सच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला. २५ मार्च रोजी सकाळी १० वाजता पहिल्या टप्प्यातील २७० लॉयर्स चेंबर्सचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या चेंबर्सचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे, अशी माहिती खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी आणि सचिव ॲड. सुहास उरगुंडे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई, न्या. अभय ओक आणि न्या. दीपांकर दत्ता यांची प्रमुख उपस्थिती राहील. याशिवाय कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. प्रसन्ना वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला, औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्या. रवींद्र घुगे यांचीही उपस्थिती राहील. प्रातिनिधिक स्वरूपात ५ वकिलांना न्यायमूर्तींच्या हस्ते चेंबर्सचे वाटप होईल. एकूण ५१० चेंबर्सपैकी पहिल्या टप्प्यात २७० चे वितरण होईल. यातील ४५ चेंबर्स राज्य शासनाच्या सरकारी वकिलांसाठी आहेत.
सुमारे २० वर्षांनंतर होणार इच्छापूर्ती२००३-०४ पासून खंडपीठ परिसरात वकिलांसाठी चेंबर्सची मागणी सुरू झाली होती. २००८ ला राज्य शासनाने औरंगाबाद खंडपीठातील ५७.५० एकरांपैकी २.१७४ एकर जागा राज्य शासनाने वकिलांच्या चेंबर्ससाठी दिली. २०११ ला ६२६ वकिलांनी प्रत्येकी एक लाख रुपये वकील संघाकडे जमा केले. २०१६ ला वास्तुविशारदांची व २०१८ ला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांची नेमणूक झाली. विविध कालखंडात कार्यरत असलेले वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सतीश तळेकर, ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. सपकाळ, ॲड. पी. आर. पाटील, ॲड. अतुल कराड, ॲड. सुरेखा महाजन आणि सचिव ॲड. शहाजी घाटोळ पाटील, विद्यमान अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी, सचिव ॲड. सुहास उरगुंडे यांच्या कार्यकाळात विविध कामे पूर्ण झाली.