दत्ता थोरे। लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मी साध्या किराणा दुकानदाराचा मुलगा. अशोक कुकडे आणि विजय कर्णिक हे माझे वर्गमित्र म्हणून आयुष्यात आले आणि मी कुटुंबाच्या पार्श्वभूमीप्रमाणे व्यापारी व्हायचे सोडून डॉक्टर झालो. वयाची ८० वर्षे समाधानाने पूर्ण केली. मला मिळालेले पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी आनंद दिला. मी मेहनत करीत गेलो ते मिळत गेले. पण या तीन पुरस्कारांपेक्षा माझ्या हातून २७ हजार शस्त्रक्रिया झाल्या, याचा आनंद मला मोठा आहे. मुंबईच्या ९३ च्या दंगलीत मी सलग ७२ तास न झोपता शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रिया करताना मृत्यू आल्यास मी यमालाही थांब म्हणेन, असा सज्जड दम प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कांतीलाल संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.खासगी दौऱ्यानिमित्त लातूर येथे आले असता ते मंगळवारी खास ‘लोकमत’शी बोलत होते. आपल्या मुलाखतीत वैद्यकीय शिक्षण, उपचार आणि मेडिकल इथिक्सबाबतही त्यांनी मते मांडली. ते म्हणाले की, पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेने भारत उपचारासाठी स्वस्त आहे. पण आरोग्याच्या विम्याबाबत जागृती नाही, जी नेमकी परदेशात आहे. आपल्या देशातील नोकरदारांचा आरोग्य विमा कंपन्या सक्तीने करतात. मात्र मध्यमवर्गीयांना आरोग्य विम्यातून उपचार होण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न हवेत. वैद्यकीय शिक्षणात सरकारचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मी बांगला देशाला गेलो होतो. तिथेही मेडिकल अॅडमिशन सरकार करते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्णालये धर्मादाय असल्यामुळे रुग्णालयाला उत्पन्न मिळत नाही. यासाठी सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा कोटा वाढवायला हवा. भारतात डॉक्टरांची संख्या कमी आहे. लोकसंख्येच्या आकारमानानुसार डॉक्टर कमी आहेत. यासाठी एका प्रोफेसरला तीन - तीन विद्यार्थी घ्यायची परवानगी द्यावी.
पद्मविभूषणपेक्षा २७ हजार शस्त्रक्रिया केल्याचा आनंद मोठा !
By admin | Published: May 17, 2017 12:03 AM